आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''लव्ह जिहादवर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. लव्ह जिहाद आहे की, आणखी काय हे पाहावे लागेल. आफताब आणि श्रद्धाचा विषय अत्यंत निर्घुन आहे. त्यानंतर अनेक मुलींच्या हत्या या हिंदु मुलांकडूनही झाल्या आहेत. धमक्या दिल्या आहेत. मुळात ही विकृती आणि अमानुषता आहे. यात जात धर्म न आणता प्रत्येक मुलीचे रक्षण व्हायला हवे ही भूमिका घ्यायला हवी.'' असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज केले. ते नाशिकमध्ये बोलत होते.
राज्यभर मोर्चे
दिल्लीत श्रद्धा वालकरची तिचाच प्रियकर आरोपी आफताब पुनावालाने निर्घृणपणे हत्या केली. यानंतर राज्यभरात हिंदूत्ववादी संघटनांकडून लव्ह जिहादचा आरोप करत मोर्चे काढले जात आहेत. नाशिकमध्येही हे मोर्चे निघत असून यावर संजय राऊत यांना सवाल करण्यात आल्यानंतर त्यांनी हे उत्तर दिले.
आज (3 डिसेंबर) त्र्यंबकेश्वरमध्येही हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व खासदार संजय राऊत नाशिकमध्ये पक्षीय कामांसाठी आले आहेत. त्यांना पत्रकारांनी लव्ह जिहादच्या आरोपावर प्रश्न विचारला. यावर राऊतांनी आपली भूमिका माध्यमांसमोर स्पष्ट केली.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊत म्हणाले, या विषयावर सर्वांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. ही प्रकरणं लव्ह जिहादची आहेत की वेगळे काही आहे यामागे हे तपासावं लागेल. आफताबने केलेली श्रद्धाची हत्या अतिशय निर्घृण आहे. त्यानंतर अनेक मुलींचे खून हिंदू मुलांकडूनही झाले आहेत आणि अनेक मुलींना धमक्याही देण्यात आल्या आहेत.
भाजपकडून ट्विटद्वारे टीका
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर भाजपकडून टीका करण्यात आली आहे. भाजपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात आफताबच्या सन्मानासाठी उद्धव ठाकरेंचा गट मैदानात उतरला आहे असा मजकूर नमूद आहे.
ही विकृती, अमानुषता
राऊत म्हणाले, श्रद्धा वालकर हिची हत्या म्हणजे विकृती आणि अमानुषता आहे. यात जात धर्म न आणता देशातील प्रत्येक कन्येचे रक्षण व्हायला हवे अशी भूमिका सर्वकष पातळीवर घ्यायला हवी.
तो माझा सन्मान
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या शिवीगाळीवर राऊतांनी स्पष्ट केले की, मला कोणी गद्दार शिव्या देत असेल, तर तो मी माझा सन्मान समजतो. त्यांना चांगल्या शिव्या येत असतील, तर त्यांनी राज्यपालांना, भाजप मंत्री आणि प्रवक्त्यांना शिव्या देऊन पाहाव्यात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.