आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोण प्रसाद लाड? छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याची त्यांची लायकी तरी आहे का?, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लाड यांचा समाचार घेतला.
तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून भाजपला शिवरायांच्या नावाची महाराष्ट्रात जी शक्ती आहे, तीच संपुष्टात आणायची आहे. मात्र, ते कधीही होणार नाही. शिवरायांची भवानी तलवारच या पक्षाचे मुंडके छाटेल, अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
संजय राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, या लाड यांच्या वक्तव्यावरून भाजपवर हल्लाबोल केला.
स्वप्नात औरंगजेब येत असावा
संजय राऊत म्हणाले, प्रसाद लाड काय इतिहासकार आहे का. शिवरायांचा जन्म कुठे झाला, त्यांचे महापरिनिर्वाण कुठे झाले, हे अख्ख्या जगाला माहिती आहे. मग तुम्ही नवनवीन शोध का लावत आहात? मला वाटतय भाजपचं डोक सरकलय. किंवा भाजप नेत्यांच्या स्वप्नात अफझल खान, औरंगजेब येत असावा. हे भाजप नेत्यांच्या कानात काही तरी मंत्र सांगत असावेत, मग सकाळी हे त्यानुसार बोलत असावेत. शिवरायांच्या नावाची जी काही शक्ती आहे, तीच यांना संपुष्टात आणायची आहे.
नवीन संशोधन मंडळ स्थापले
संजय राऊत म्हणाले, भाजपने इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केलीये का? त्यातून असे शोध बाहेर पडत आहेत. हे सर्व कठीण आहे. सरकार अशा नेत्यांच्या भरवशावर चालवले जात असेल तर कठीण आहे. जे लोक आपल्या स्वार्थासाठी छत्रपतींना सोडत नाही. त्यांच्याबाबत अवमानजनक असे बोलतात, ते आम्हाला काय सोडणार. ते शिवसेनेविरोधात अभद्र बोलणारच.
राष्ट्रपती कारवाई करणार नाहीत
संजय राऊत म्हणाले, राज्यपालांवर राष्ट्रपती काहीही कारवाई करणार नाहीत. राष्ट्रपतींनी केवळ आपल्याला उदयनराजेंचे पत्र मिळाले, अशी पोचपावती दिली आहे. राज्यपालांवर कारवाई पंतप्रधान मोदी किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच करू शकतात. राष्ट्रपती स्वत:च्या मर्जीने कारवाई करतील, अशी शक्यताच नाही. भाजपने सर्व संस्था आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत.
महाराष्ट्रातील जनता हीच खरी ताकद
संजय राऊत म्हणाले, राज्यपालांविरोधात महाराष्ट्राची जनता हीच खरी ताकद आहे. उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे यांनी जी काही भूमिका मांडली आहे, तीच महाराष्ट्राची ताकद आहे. राज्य सरकार आता नेभळट झाले आहे. त्यामुळे आता खरे आव्हान विरोधी पक्षांसमोरच आहे. विरोधी पक्ष काय करू शकतो, याची भूमिका आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.