आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे नाशिक संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरींची हकालपट्टी:संजय राऊत यांचे विश्वासू, आता शिंदे गटामध्ये प्रवेशाची चर्चा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जेमतेम चार दिवसातच नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जोरदार झटका देत बारा माजी नगरसेवकांपाठोपाठ थेट संपर्कप्रमुख आणि खासदार संजय राऊत यांचे अत्यंत खास अशी ओळख असलेल्या भाऊसाहेब चौधरी यांना गळाला लावल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर पक्षाने ट्विट करून त्यांची हकालपट्टी जाहीर केली.

शिंदे गटात जाण्याची चर्चा

गेल्या काही दिवसापासून चौधरी यांनी संघटनेपासून दूर राहण्याची भूमिका घेतली होती तसेच 12 माजी नगरसेवकांच्या बंडानंतर ते पक्ष कार्यालयाकडे फिरकले नसल्यामुळे ते शिंदे गटात जातील अशी चर्चा होती.

आतापर्यंत ठाकरेंनाच साथ

जून महिन्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी बंड केल्यानंतर नाशिक शहरातील शिवसेना मात्र अभेद्य होती. पालकमंत्री दादा भुसे खासदार हेमंत गोडसे आमदार सुहास कांदे यांच्यासारख्या दिग्गजांनी ठाकरे गटाचा हात सोडल्यानंतर ही स्थानिक नगरसेवक एकत्र होते.

नाशिक शिवसेनेला आता तडाखा

पक्षांतर्गत वाढती गटबाजी तसेच आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे भवितव्य धूसर दिसत असल्याचे बघून गेल्याच आठवड्यामध्ये अर्थातच शुक्रवारी मध्यरात्री माजी विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते यांच्या उपस्थितीमध्ये ११ माजी नगरसेवकांनी प्रवेश केला. त्यानंतर चौधरी हे नाशिक मध्ये येऊन संभाव्य डॅमेज कंट्रोल करतील अशी अपेक्षा होती मात्र ते साधे पक्ष कार्यालयाकडे देखील फिरकले नाही.

पक्षाकडून हकालपट्टी, ट्विटही केले

मंगळवारी सायंकाळी ते नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरू झाल्यानंतर, त्यांनी ट्विट करून त्यांची हकालपट्टी घोषित केली. नाशिक शिवसेनेसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. गेल्या काही दिवसापासून चौधरी हे पक्षांमध्ये अस्वस्थ असल्याची चर्चा होती मात्र मध्यंतरी चौधरी यांच्या मोठ्या आजारपणाच्या काळामध्ये पक्षाने सहानुभूती दाखवत त्यांच्याकडील जबाबदारी कायम ठेवत विश्वास दाखवला होता.

चौधरी यांच्या कार्यकाळामध्ये सेनेची पडझड..

भाऊसाहेब चौधरी यांची संपर्कप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर नाशकात शिवसेनेची पडझड झाल्याचे दिसून आले. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांना फारशी पकड घेता आली नाही. भाजप सोबत युती असताना खासदार म्हणून हेमंत गोडसे निवडून आले मात्र सिन्नर देवळाली व इगतपुरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदारांचा पराभव झाला.

बंडामागे चौधरी यांचाच हात

''शिवसेना पक्षाने भाऊसाहेब चौधरी यांना मोठी जबाबदारी दिली होती त्यांचे आजारपणाच्या काळातही उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत पद कायम ठेवले होते. गेल्या आठवड्यात 12 नगरसेवकांनी जो प्रवेश केला, त्यामागे आता त्यांचा हात असल्याची चर्चा खरी ठरु लागली आहे.'' - सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख , ठाकरे गट.

बातम्या आणखी आहेत...