आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसे, कांदे, गाेडसे निवडून येता कामा नये:संजय राऊत यांचा शिवसैनिकांना आदेश; यापुढे नेता नव्हे तर पक्ष हाच चेहरा

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते तथा खासदार संजय राऊत यांनी नाशिकच्या भुमीत पहिलीच बैठक घेत पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे व हेमंत गाेडसे यांच्यापैकी एकही निवडून येता कामा नये असे आदेश वजा संदेश पदाधिकारी व माजी नगरसेवकांना आज दिला.

यापुढे नेता नव्हे तर पक्ष हाच चेहरा असणार असून नाशिक लाेकसभा मतदारसंघात त्याची प्रचिती दिसेल असेही सुचक वक्तव्य त्यांनी केले.

डॅमेज कंट्रोलसाठी राऊत नाशिकमध्ये

नाशिकमधील अंतर्गत गटबाजीमुळे बारापेक्षा अधिक माजी ज्येष्ठ नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा हाेती. याबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर डॅमेज कंट्राेलसाठी राऊत यांनी नाशिक गाठले. यावेळी राऊत यांनी महत्वाचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवकांशी वैयक्तिक चर्चा करीत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या नाराजीचे कारण काय, तसेच सत्ताधारी पक्षाकडून काही कारवाया सुरू आहे का याची खबरबात घेतली.

ठाकरेंच्या मागे राहा

प्रसंग बिकट असल्यामुळे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून उद्धव ठाकरे यांच्यापाठीमागे उभे राहा असेही आवाहन केले. पक्षाच्या प्रतिकुल परिस्थीतीत साथ देणाऱ्यांना नक्कीच न्याय दिला जाताे, अशी समजूतही काढली. दरम्यान, यावेळी भुसे, गाेडसे व कांदे यांच्या मतदारसंघातील राजकीय परिस्थीतीचा आढावा घेतला. पक्षाशी केलेल्या गद्दारीबाबत लाेकांमध्ये जागृती करून सक्षम पर्याय उभा करा असाही संदेश दिल्याचे समजते.

काेण गाेडसे ? खरे ना विजय...

नाशिक लाेकसभा मतदारसंघाचे खासदार गाेडसे यांच्याविराेधात राऊत यांचा राेष दिसून आला. सेनेमुळे निवडून आल्यानंतर त्यांनी केलेल्या गद्दारीमुळे त्यांची राजकीय इनिंग संपल्याचाही दावा केला. शिवसेनेमुळे गाेडसे खासदार झाले. येथे नेते नाही तर पक्ष हाच चेहरा असताे. खरे ना विजय असे त्यांनी जिल्हाप्रमुख करंजकर यांचे नाव घेत सांगितल्यामुळे सेनेचा पुढील दावेदारही त्यांच्यारूपाने चर्चत आला.

तक्रारीचा पाऊस..

दरम्यान, काही नाराज माजी नगरसेवकांनी एका बड्या पदाधिकाऱ्याच्या कारभाराबाबतही तक्रारींचा पाऊस पाडला. त्यावर राऊत यांनी सर्वांचे ऐकून घेत उपाय करू असे आश्वासन दिले. याबाबत पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर, काेणी कितीही अविश्वास वा संशयाचे धुके निर्माण केले तरी सर्व निर्णय हे माताेश्रीवरून उद्धव ठाकरेच घेतात. त्यामुळे काेणीही स्थानिकांकडून आपला पत्ता कट हाेईल अशी भिती बाळगू नये असे सांगत आश्वास्त करण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...