आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतापाची लाट:संयोगिता राजेंना काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्र म्हणण्यास मज्जाव, महंत सुधीरदास घेणार शाहू महाराजांची भेट

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला. या प्रकाराने उद्विग्न झालेल्या संयोगीताराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या भावना मांडल्या. त्यानंतर पुजाऱ्यांविरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. या सगळ्या वादानंतर आता काळाराम मंदिरातील संबंधित पुजारी हे संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज यांची भेट घेणार आहे.

संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे यांनी 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिरास भेट दिली. यावेळी पुजा करताना महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. मात्र आपणास हा अधिकार नसल्याचे सांगत महंतांनी विरोध कायम ठेवल्याचे संयोगीताराजे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

स्वराज्य संघटनेचे आंदोलन मागे

संयोगीताराजे छत्रपती यांची पोस्ट वेगाने व्हायरल झाली. समाजाच्या विविध स्तरातून याविरोधात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर स्वराज संघटनेकडूनही याविरोधात आंदोलन छेडण्याच तीव्र इशारा देण्यात आला होता. स्वराज संघटनेचे मुख्य प्रवक्ते करण गायकर यांनी सांगितले की, संयोगिताराजे छत्रपती यांनी केलेली पोस्ट ही अपप्रवृत्तीच्या विरोधात आहे. मात्र या संदर्भातील स्वराज्य संघटनेचे आंदोलन मागे घेत असून सध्या रामनवमी उत्सव सुरू असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

दिलगिरी व्यक्त करतो

संयोगिता राजे छत्रपती यांच्याशी वाद झालेल्या पुजाऱ्याचे नाव महंत सुधीरदास असे आहे. हा प्रकार गैरसमजातून झाल्याची शक्यता महंत सुधीरदास यांनी सांगितले आहे. मात्र, या सगळ्यामुळे छत्रपती घराण्याचा अनादर होत असेल तर आपण दिलगिरी व्यक्त करतो. महंत सुधीरदास हे कोल्हापूर येथे थोरले शाहू महाराज यांची भेट घेणार आहेत. त्यांच्यासमोर ते आपली बाजू मांडतील.

नेमके काय आहे प्रकरण?

संयोगिता राजे छत्रपती नाशिकच्या काळाराम मंदिरात गेल्या होत्या. त्यावेळी महंतांनी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशा मुळे मी ठामपणे विरोध केल्याचे संयोगिता राजे यांनी म्हटले आहे. अनेक कारणे देऊन वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे सांगितले. पुढे त्यांनी म्हटले आहे की, शेवटी मी विचारले की ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली, मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. तरीही मी महामृत्युंजय मंत्र जप का केला म्हणुन त्यांनी प्रश्न केलाच...तेव्हा मात्र परमेश्वराच्या लेकराला, आपल्या ईश्वराला भेटायला आणि त्याची स्तुती करायला तुमच्या मध्यस्थीची गरजच नाही, असे सुनावले. त्यानंतर मी तिथेच रामरक्षा पण म्हणली.

या प्रसंगाने माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला की शंभर वर्षात ही मानसिकता का बदलली नाही? अजूनही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेल्या विचारांना खूप खोलवर रुजवावे लागणार आहे.

संबंधित वृत्त

मज्जाव:काळाराम मंदिरामध्ये वेदोक्त मंत्र म्हणण्यास विरोध

नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगीताराजे छत्रपती यांना वैदिक मंत्र म्हणण्यास विरोध करण्यात आला. त्याकाळी शाहू महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणेक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर संयोगीताराजे यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. वाचा सविस्तर