आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैन ओरबाडली:सातपुरला सोनसाखळी चाेरासह सराफास अटक; चाेरट्यांकडून 2 लाख 17 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडणाऱ्या चंद्रकांत केदारे या चोरट्यासह त्याच्याकडून चोरीचे सोनं विकत घेणाऱ्या कृष्णा दिलीप टाक (३३) या सराफाला सातपूर पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही ५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सातपूर परिसरात त्याने तीन ठिकाणी महिलांच्या गळ्यातील चैन ओरबाडली असून त्याच्याकडून अजूनही सात ते आठ गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. चाेरट्यांकडून २ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सातपूरच्या श्रमिकनगर परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत कौतिक केदारे (२८) याने भरदिवसा महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडण्याचा धडाका लावला होता. सलग दोन दिवस सोनसाखळी ओरबाडण्याच्या घटनांमुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. ३० ऑगस्टला राधाकृष्णनगर चौकातून पायी जाणाऱ्या प्राची पुरुषोत्तम बाबर यांच्या गळ्यातील ३३ हजाराची साेनसाखळी मोटारसायकलवरून आलेल्या चोराने ओरबाडली होती. पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त सोहेल शेख, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक महेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत नागरे यांनी तीन पथके तयार करून परिसरातील सीसीटीव्हीचे बारकाईने निरीक्षण केले. सोनसाखळी चोराने परिधान केलेले कपडे व त्याच्याकडे लाल काळ्या रंगाचे हेल्मेट, तसेच होंडा शाइन मोटारसायकल व टाकीला लाल पट्टे असल्याचे निष्पन्न झाले होते. डी. बी. पथकाच्या तिन्ही टीम श्रमिकनगर, कार्बन नाका व राधाकृष्णनगर भागात संशयिताचा शोध घेत होत्या.

याचवेळी श्रमिकनगरातील हिंदी शाळेच्या परिसरात वरील वर्णनाचा संशयित पथकातील कर्मचारी विनायक आव्हाड व सागर गुंजाळ यांना दिसला. त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली देतानाच श्रमिकनगरमधील निर्मित लाइफ फेज येथे राहणाऱ्या कृष्णा दिलीप टाक या सराफाला सोने विक्री केल्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...