आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराची ‘सरिता’; मराठी-संस्कृत शब्दकोशाचे आज प्रकाशन

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरिता रमेश देशमुख एम. ए. बी.एड. संस्कृत शिक्षणानंतर नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या जु. स. रुंग्टा विद्यालयात शिक्षिका तर २००५ या वर्षी पुष्पावती रुंग्टा कन्या विद्यालयातून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाल्या.

मराठी-संस्कृत शब्दकोश निर्माण व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. या शब्दकोशासाठी त्यांनी संस्कृत अभ्यासिका श्रद्धा शहा, तेजश्री वेदविख्यात व प्रा. मीनल पत्की यांचे सहायक संपादिका म्हणून शब्दकोश निर्मितीत योगदान आहे. शब्दकोशाची मूळ प्रेरणा पुण्याच्या डॉ. अविनाश बिनीवाले यांनी सरिता देशमुख यांना दिली. पुणे विद्यापीठाचे अधिसंलग्न प्रा. डॉ. रवींद्र मुळे यांचे मार्गदर्शन मिळाले. हं. प्रा. ठा. महाविद्यालयातील संस्कृत विभागप्रमुख डॉ. लीना हुन्नरगीकर यांनी शब्दकोशाचे निरीक्षण केले. मराठी भाषेतील ८५०० शब्दांना संस्कृत पर्याय शोधले आहेत. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्दाला अनेक पर्याय असल्याने संस्कृत शब्दांची संख्या मराठीपेक्षा चौपट आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वी मराठी संस्कृत शब्दकोश १९६९ मध्ये पिलोबा जोशी यांनी तयार केला, असे समजते. त्यानंतर प्रथमच अशाप्रकारचा शब्दकोश निर्माण होत आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे, मराठी शब्दांना केवळ पर्यायी संस्कृत शब्द नाहीत. शब्दांसाठी उदाहरणे दिली आहेत. प्राथमिक संस्कृत व्याकरणाची रूपरेखा देण्यात आली आहे. काही संस्कृत शब्द नवीन तयार केले आहेत. कारण हे संस्कृत भाषेचे सामर्थ्य आहे. या शब्दकोशाचा संस्कृत अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना, अनुवादक, शासकीय कार्यालयांना उपयोग होऊ शकेल.

संपादिका सरिता देशमुख यांना भगवद‌्गीतेचे १८ अध्याय व ७०० श्लोक पाठांतर असल्याबद्दल शंृगेरीच्या शंकराचार्यांकडून त्यांचा सन्मान झाला आहे. गेल्या ४० ते ५० वर्षे संस्कृत कार्याबद्दल महाराष्ट्राच्या कालिदास संस्कृत साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. एस. एस. सी. बोर्डाच्या संस्कृत समिती सदस्या, महाराष्ट्र संस्कृत स्थायी समिती सदस्या, संस्कृत मंडळ उपाध्यक्षा या महत्त्वाच्या पदांवरही त्यांनी कार्य केले आहे. गोगटे परिवारातर्फे संस्कृत संवर्धन कार्याबद्दल डॉ. वि. म. गोगटे प्रथम पुरस्काराने सरिता देशमुख व रमेश देशमुख यांना सुवर्णमहोत्सवी समारंभात सन्मानित करण्यात आले. संस्कृत भाषा सभेच्या माध्यमातून सरिता देशमुख यांनी केलेले कार्य अतुलनीय आहे.

संस्कृत आणि भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी संस्कृत भाषा सभा ही संस्था गेल्या ५० वर्षांपासून कार्यरत आहे. यंदा संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत आहे. गौतमी प्रकाशनतर्फे रविवारी (दि. १२) मराठी-संस्कृत शब्दकोश प्रकाशन गंगापूररोडवरील डॉ. कुर्तकोटी सभागृहात सायंकाळी ६ वाजता होत आहे. या शब्दकोशाच्या प्रमुख संपादिका सरिता रमेश देशमुख यांचे संस्कृत भाषेच्या प्रसारात मोठे योगदान आहे. सभेच्या कार्यदर्शिनी म्हणून त्यांनी गेली अनेक वर्षे मोठे कार्य उभारले आहे. त्यानिमित्ताने....

स्वरप्रभाची सरिता...
वयाची साठी झाली व आमच्या स्वरप्रभा गायन क्लासमध्ये विद्यार्थी म्हणून सरिताताई दाखल झाल्या. एक प्राचार्य विद्यार्थी म्हणून आल्यावर आम्हा सर्वांवर खूप दबदबा होता. कारण त्यांचे सामाजिक व संस्कृत भाषा चळवळ प्रचंड प्रमाणात मोठी होती. संस्कृत भाषा सोप्या पद्धतीने उकल करून बरेच सुभाषित व अन्नपूर्णा श्लोक त्यांनी शिकविले. आज जो शब्दकोश बनविला आहे त्यासाठी गेली कित्येक वर्षे श्रद्धाताई, मीनलताई, तेजश्रीताई या सहचारिणींबरोबर काम करत आहेत. आम्हाला व आमच्या क्लासला त्यांचा खूप अभिमान वाटतो.
- हर्षा वैद्य, विद्यार्थिनी

अभ्यासूंसाठी शब्दकोश
सरिता देशमुख्या यांच्याबरोबर या शब्दकोशाच्या निर्मितीमागील स्तुत्य हेतू व घेतलेला ध्यास फार जवळून अनुभवता आला. सर्वसामान्य अभ्यासू व जिज्ञासू भाषा अभ्यासकांना याचा खूप फायदा होईलच, पण संस्कृत भाषेचा सर्वदूर प्रचार व प्रसार होण्यासाठी हा कोश विशेष लाभदायक ठरणार आहे. श्रीयुत देशमुख सर व सरिता काकूंच्या सर्व शब्दकोश रचनाकार सहकारी भगिनींची या कार्यात बहुमोल साथ लाभली.
- विलास पाटणकर

बातम्या आणखी आहेत...