आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:आम्ही बरे झालो, तुम्ही लवकरच बरे व्हाल..., काळवंडलेले वातावरण बदलण्याच्या आवाहनाला प्रतिसाद

सटाणा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी शहरातील चौका-चौकात कोरोनाने बळी घेतलेल्यांचे श्रद्धांजलीचे फलक झळकत होते. सोशल मीडियावरही तेच सुरू असल्याने आधीच कोरोनामुळे काळवंडून गेलेल्या वातावरणाने अंत:करण आणखी जड होत होते. हे चित्र बदलण्याचा निर्धार एका पोलिस अधिकाऱ्याने केला आणि तरुणांनी हे श्रद्धांजलीचे फलक हटवून कोरोनावर ज्यांनी मात केली त्यांचे फलक चौकाचौकात झळकवले. अत्यंत कठीण काळात हे फलक नागरिकांना दिलासा देऊ लागले आणि या निर्णयाचे कौतुक होऊ लागले. परिस्थितीवर आपले पूर्णपणे नियंत्रण नसते. मात्र, त्यावर आपला प्रतिसाद हे पूर्णपणे आपल्या हातात असते. हाच संदेश देत येथील सहायक पाेलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांनी कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या सटाणा शहरातील नागरिकांना सकारात्मक आवाहन केले आणि नागरिकांनी त्यास तत्काळ प्रतिसाद दिला. सटाण्यात कोरोनाने विळखा घट्ट केला असून रोज बाधितांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मागील आठवड्यापासून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर शहराच्या मुख्य चौकांत, रस्त्यांवर भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक झळकले होते. यामुळे कोरोनाबाधित रुग्ण व नातलगांमध्ये भीती पसरून त्यांचा आत्मविश्वासही कमी झाला.

ही बाब लक्षात घेता शिंदे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे फलक हटवत त्याऐवजी ‘आम्ही कोरोनातून बरे झालो आहोत, तुम्ही पण लवकरच बरे व्हाल’ असा संदेश असलेले फलक फोटोसह लावण्याचे आवाहन केले. या आवाहनाकडे सकारात्मकतेने पहात मल्हाररोड युवा प्रतिष्ठानच्या युवकांनी शहरातील सर्व श्रद्धांजलीचे बॅनर काढले. दुसऱ्या दिवशी ‘आम्ही कोरोनातून बरे झालो आहोत, तुम्ही पण लवकरच बरे व्हाल’ असा संदेश देणारे व कोरोनामुक्त नागरिकांचे छायाचित्र व नाव असलेले फलक झळकविले. सागर सोनवणे, राहुल शेलार, अमोल देवरे, अमित हेडा, परेश देवरे, हर्षल जाधव, अनिल सोनवणे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

‘व्हाॅट्सअॅप’वरील मृतांची माहिती, फोटोने मनोधैर्य खचते
कोरोनाबाधित रुग्णाला आपल्या तब्येतीची माहिती देण्यासाठी व स्वतःच्या मनोरंजनासाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. मात्र, असे निदर्शनास आले आहे की, व्हाॅट्सअॅपवर अनेक नागरिक मृत्यूच्या बातम्या व्हायरल करत असून श्रद्धांजलीचे फोटोही स्टेट‌्सवर ठेवत आहेत. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचे मनोधैर्य खचत असून सोशल मीडियावरही श्रद्धांजली वाहू नये. - जितेंद्र इंगळे-पाटील, तहसीलदार, बागलाण

सकारात्मक परिणाम लवकरच
कोरोना म्हणजे मृत्यू हा गैरसमज काढून स्वच्छता, सुरक्षित अंतर व मास्कचा योग्य वापर करून व्यायाम व योग्य आहार या सर्वांच्या जोरावर आपण या आजारातून मुक्त होऊ शकतो. फलकांबाबतच्या उपक्रमाचे लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील. - डॉ. सीमा खैरनार, सटाणा

स्वत:च्या गावीही हाच उपक्रम
स्वतःच्या आईला कोरोनाच्या नकारात्मक मानसिकतेतून बाहेर काढण्यात यश आल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत आई बरी झाली. यामुळे या सकारात्मक ऊर्जेचा सटाणा शहरासाठी उपयोग करण्याचे ठरवले. शहरवासीयांनी दिलेल्या प्रतिसादामुळे प्रभावित झालो. हाच उपक्रम स्वतःच्या निभगूळ (ता. शिंदखेडा) या गावीही राबवला असून याचा योग्य परिणाम दिसत आहे. - देवेंद्र शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक, सटाणा

बातम्या आणखी आहेत...