आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुरशीची लढत:सावानाची मुख्य पदे केली ‘सर’; सावानाच्या पदाधिकारी निवडीत ग्रंथालय भूषण पॅनलला निसटता कौल

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वजनिक वाचनालयाच्या निवडणुकीत ग्रंथालय भूषण पॅनलने अध्यक्ष, उपाध्यक्षपद ही मुख्य पदे सर केली. अध्यक्षपदी प्रा. दिलीप फडकेसर तर उपाध्यक्षपदी प्रा. डॉ. सुनील कुटेसर आणि वैद्य विक्रांत जाधवसर या तीन सरांना सभासदांनी निसटता कौल दिला. त्यांना ग्रंथमित्र पॅनलच्या उमेदवारांनी चुरशीची लढत दिली. अखेरीस अत्यंत थोड्या फरकाने तीनही सर निवडून आल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. शंकरराव सोनवणे यांनी केली.

सार्वजनिक वाचनालय, नाशिकच्या १८ जणांच्या कार्यकारिणीसाठी २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी (दि. ८) मतदान झाले. दोन पॅनलसह ४८ उमेदवार रिंगणात होते. ३९०५ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. सोमवारी (दि. ९) सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. अध्यक्षपदासाठी मतमोजणीच्या फक्त दोनच फेऱ्या झाल्या.

पहिल्या फेरीत १२५ मतांची आघाडी घेत ग्रंथमित्र पॅनलच्या वसंत खैरनार यांनी आघाडी घेतली होती. त्यांना १५७५ मते मिळाली होती. तर ग्रंथालय भूषण पॅनलचे प्रा. दिलीप फडके यांना १४५० मते मिळाली होती. २० मते बाद झाली होती. उरलेल्या ८६० मतांमधून मात्र खैरनार यांना ३२९ मते तर ५२७ मते फडकेंना मिळाली. ४ मते बाद झाली. त्यामुळे १९७७ मते घेत फडके यांनी वसंत खैरनार यांचा ७३ मतांनी पराभव केला. खैरनार यांना १९०४ मते मिळाली. अध्यक्षपदी फडके यांचा विजय जाहीर होताच सभागृहात ग्रंथालय भूषणच्या उमेदवारांनी जल्लोष केला.

उपाध्यक्षपदासाठी ग्रंथालय भूषण पॅनलकडून प्रा. डॉ. सुनील कुटे, वैद्य विक्रांत जाधव तर ग्रंथमित्र पॅनलकडून मानसी देशमुख, प्रा. डॉ. दिलीप धोंडगे रिंगणात होते. यात वैद्य विक्रांत जाधव यांनी सर्वाधिक २०२७ मते तर डॉ. कुटे यांनी १९८७ मते घेत विजय मिळवला. देशमुख यांना १६९० तर प्रा. धोंडगे यांना १८२६ मते मिळाली.

१४० मते बाद झाली. सुरुवातीपासूनच जाधव आणि कुटे यांनी मतांची आघाडी घेतली होती. निवडणूक अधिकारी साेनवणे यांनी कुटे आणि जाधव यांच्या नावाची घोषणा करताच ग्रंथालय भूषण पॅनलच्या प्रतिनिधींनी आणि इतर उमेदवारांनी गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.

बातम्या आणखी आहेत...