आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमबाह्य भरती प्रक्रिया:‘मुक्त’तील घोटाळे; आजचा चौकशी दाैरा ऐनवेळी बारगळला

नाशिक / किशोर वाघ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घोटाळ्यांमुळे कायम चर्चेत असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विविध ११ घोटाळ्यांच्या तपासणीसाठी पुणे येथील उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक कार्यालयाचे पथक ७ व ८ सप्टेंबरला दोन दिवस विद्यापीठात येणार होते. विद्यापीठाच्या वतीने याबाबत सर्व पूरक माहितीही उपलब्ध ठेवण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले होते. परंतु, एक दिवस आधीच या पथकाचा नियोजित दौरा अचानक रद्द झाला. नेमका हा दौरा का रद्द झाला? कुठल्या घोटाळ्यात नेमके पाणी मुरले? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत असून पुन्हा केव्हा सहसंचालकांकडून या मुद्यांची तपासणी केली जाईल, असाही मुद्दा उपस्थित केला जात आहे. मुक्त विद्यापीठात गत ८ ते १० वर्षांत मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाले आहेत. यात उत्तरपत्रिकांची छपाई असो की ट्युडी अॅनिमेशन कोर्स किंवा भूखंड अन् झालेली विविध बांधकामे असो वा नियमबाह्य भरती प्रक्रिया. या सर्वच बाबींमध्ये मोठे घोटाळे झाले आहेत. याबाबत विविध चौकशी समित्याही नियुक्त करण्यात आल्या होत्या. पण या बाबींचे पुढे नेमके काय झाले? समित्यांनी चौकशीचे अहवाल दिले की नाही ? त्यानुसार पुढील कारवाई झाली का? याबाबत गुप्तता ठेवण्यात आली आहे. याबाबत विचारणा केल्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाने त्याबाबत सोयीस्कर मौन पाळले आहे. त्यातच सहसंचालक कार्यालयाने चौकशीसाठी मोनाली बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली पथक ७ आणि ८ सप्टेंबरला येणार होते. पण आदल्या दिवशी (दि. ६) हे पथक येणार नसल्याचे ऐनवेळी कळविल्याने पुन्हा नवीन चर्चेला तोंड फुटले आहे.

मुक्त विद्यापीठातील या घोटाळ्यांची चाैकशी
ट्युडी अॅनिमेशन घोटाळा, यश भारती स्टुडिओ बंद असताना दिलेले कंत्राट, उत्तरपुस्तिका स्कॅनिंग, अकाउंटिंग सॉफ्टवेअर बदल करून झालेला खर्च, गंगाजळीची मुक्त हस्ते उधळण, भूखंड खरेदी व बांधकाम घोटाळा, संविधानिक पदे न भरता केलेली कार्यवाही, १७ कर्मचाऱ्यांना दिलेल्या नियमबाह्य नियुक्त्या, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नियुक्त्या, यूजीसीने मान्यता रद्द केलेल्या कोर्सबाबत, किऑस्क मशीन पडून, कुलसचिवांचा अनिर्बंध भ्रष्टाचार, तीन तासांच्या मराठी भाषेच्या कार्यक्रमासाठी झालेला खर्च, आदिवासी शिष्यवृत्ती.

आम्ही तयार होतो
सहसंचालकांच्या आदेशाने तपासणीसाठी २ दिवस हे पथक येणार होते. आम्ही तयारी करून ठेवली आहे. सर्व माहिती उपलब्ध केली आहे. परंतु, हा दौरा रद्द झाला आहे. नवीन तारखा त्यांच्याकडून दिल्या जाणार आहेत.
- डॉ. प्रकाश देशमुख, प्रभारी कुलसचिव, मुक्त विद्यापीठ

बातम्या आणखी आहेत...