आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होत असून विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करताना कोविड नियमांचे पालन करावे. १३ व १४ जूनदरम्यान शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबवून वर्गखोल्यांची स्वच्छता, शालेय आवाराची साफसफाई, सॅनिटायझर, तापमान तपासण्याची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंग याची खबरदारी घेऊनच विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मुख्याध्यापकांना केले. २०२२ व २०२३ या नवीन शैक्षणिक वर्षाला येत्या १५ जूनपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शाळांची पूर्वतयारी, शालेय प्रशासकीय कामकाज यासंदर्भात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी जि. प.च्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे मुख्याध्यापक व प्राचार्य यांची जिल्हास्तरीय सहविचार सभा शुक्रवारी (दि. १०) रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा, गुणवत्तावाढीकडे लक्ष द्या या सभेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी मुख्याध्यापक व प्राचार्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोविडकाळात विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले. गुणवत्तेचा आलेख खालावला आहे. त्यामुळे या वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांना मेहनत घ्यावी लागेल. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्ह्यातील एक हजार २०० मुख्याध्यापकांची उपस्थिती या सहविचार सभेस नाशिक जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील सुमारे एक हजार २०० मुख्याध्यापक सहभागी झाले होते. यावेळी नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने मुख्याध्यापकांनी शिक्षण विभागाच्या सूचनांची माहिती जाणून घेतली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.