आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा पवित्रा:सेना-भाजपचे वैचारिक नाते कायम, राणेंना नंतर पश्चात्ताप होईल : शिवसेना खासदार संजय राऊत

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणेंवर टीका, भाजपविरोधात नरमाई

मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त विधानानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर एकीकडे कडवट टीका करतानाच शिवसेनेने भाजपच्या दिशेने मात्र समझोता-सबुरीचे संदेश पाठवण्याचा नवा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत शनिवारी नाशकात होते. त्या वेळी त्यांच्या बोलण्यातून हा नवा पवित्रा दिसून आला. भाजपचे नेते आमच्यावर हल्ला करू शकत नाहीत. ती त्यांची संस्कृती नाही. त्यामुळेच बाहेरच्या नेत्यांचा वापर करून ते चिखलफेकीचा प्रयत्न करत अाहेत. पण शिवसेना-भाजपचे वैचारिक नाते कायम आहे.

राजकारणात काहीही अशक्य नाही. राणेंना नंतर पश्चात्ताप होईल, असे सूचक विधान राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. मात्र त्याच वेळी राणेंना मानसिक आधाराची गरज असून शिवसैनिक त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतील, असा टोला त्यांनी लगावला. नाशकात शनिवारी खा. राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे. कायद्याच्या चाैकटीबाहेर जाऊन जर कुणीही चुकीचे वक्तव्य करत असेल तर त्यांच्यावर कायद्याच्या प्रक्रियेनुसार कारवाई होईल. राणे केंद्रीय मंत्रिपदी आहेत. त्यांनी कायद्याचे पालन केले पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

राणेंचे विधान मुख्यमंत्र्यांना पटले नाही
शिवसेना आणि भाजप सध्या एकत्र नसले तरी आमचे हिंदुत्वाचे वैचारिक नाते एकच आहे. एका व्यक्तीमुळे हे नाते तुटून जाते की काय अशी स्थिती आहे. नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत केलेले विधान शिवसैनिकांना तसेच स्वत: उद्धव ठाकरे यांनाही पटलेले नाही, असेही राऊत यांनी सांगून भारतीय जनता पक्षाचे नेते शिवसेनेवर हल्ला करू शकत नाहीत. त्यांची ती संस्कृती नाही. बाहेरचे नेते घेऊन ते आमच्यावर चिखलफेक करताहेत. मात्र, त्याला शिवसैनिक प्रत्युत्तर देतील, असे ते म्हणाले.

राणेंनी योग, विपश्यना करावी
राऊत म्हणाले, नारायण राणेंचे मन:स्वास्थ बिघडले असून त्यांना आधाराची गरज आहे. राणेंची आम्हाला चिंता वाटते असे सांगत त्यांनी उत्तम स्वास्थ्यासाठी योगा व विपश्यना करावी, असा अनाहूत सल्लाही राऊत यांनी दिला. त्याचबरोबर शिवसेनेवर हल्ला करणाऱ्यांचा यापुढेही योग्य वेळी ‘करेक्ट कार्यक्रम करू,’ असा इशाराही खासदार संजय राऊत यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...