आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून राजस्थान आणि गुजरातमार्गे थंड वारे येत असल्याने महाराष्ट्रातही चांगलाच गारठा वाढला आहे. राज्यात सोमवारी ( २ जानेवारी) नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे नीचांकी ७.१ तापमानाची नोंद करण्यात आली. औरंगाबादेत पारा ९.४ तर नाशकात १०.२ वर होता.
दरम्यान, राज्यात पुढील पाच दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान १४ ते १५ तर कमाल २६ ते २९ अंशांदरम्यान आहे. सरासरीपेक्षा तापमान १ ते २ अंशांनी घसरले आहे. कोकण, उत्तर महाराष्ट्रासह अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला अमरावती जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावले आहे.
देश : यूपी, हरियाणा व राजस्थानसह ४ राज्यांत थंडीची लाट, बिहार-पंजाबात विमान उड्डाणे रद्द
नवी दिल्ली
नववर्ष सुरू होताच गारठाही वाढू लागला आहे. उत्तर भारतात या आठवड्यात थंडी आणखी वाढणार आहे. भारतीय हवामान विभागानुसार (आयएमडी), पुढील चार ते पाच दिवसांदरम्यान हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानात थंडीची लाट येणार आहे. हलके वारे आणि गंगेच्या मैदानी भागांत पृष्ठभागावर जास्त आर्द्रता असल्यामुळे काही भागांत दाट धुके दाटलेले राहणार आहे. धुक्यामुळे सोमवारी पंजाब आणि बिहारमध्ये अनके विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. दिल्लीत सोमवारी सकाळी कमान तापमान ७.६ अंश होते. येथील एअर क्वालिटी निर्देशांक ३०१ वर पोहोचला, जो ‘अत्यंत खराब’ श्रेणीतील होता. दुसरीकडे, डोंगराळ भागांत बर्फवृष्टीसह पाराही सातत्याने घसरत चालला आहे.
औरंगाबाद : दिल्लीहून येणारे इंडिगोचे विमान धुक्यामुळे रद्द
नवी दिल्लीतील धुक्यामुळे औरंगाबादला येणारे सायंकाळचे इंडिगोचे विमान रद्द करण्यात आले. नवी दिल्लीहून हे विमान दुपारी ३.१५ निघून चिकलठाणा विमानतळावर सायंकाळी ५.१० वाजता पोहोचते. धुक्यामुळे इंडिगोने सायंकाळी येणारे विमान रद्द झाल्याचे संदेश दिले. सोमवारी दिल्लीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होती. वेळीच सूचना मिळाल्याने अनेकांनी मुंबईमार्गे जाण्याचा निर्णय घेतला. काहींनी एअर इंडियाच्या विमानाने दिल्ली गाठली.
राज्यात शहरांतील नीचांकी तापमान
ओझर ७.१0
औरंगाबाद ९.४0
जळगाव १०.०
नाशिक १०.२
पुणे १०.९
सातारा १४.०५
परभणी १४.६
उस्मानाबाद १३.०
पंजाब-हरियाणाच्या अनेक भागांत दाट धुक्याची चादर
दोन्ही राज्यांतील अनेक भागांत धुक्याची दाट चादर होती. सोमवारी भटिंड्यात िकमान तापमान ६.५ अंश होते. हरियाणाच्या मंडकोलात किमान तापमान उणे १.३ अंश होते. ४ दिवसांत तापमान आणखी घसरेल.
राजस्थान : अनेक भागांत किमान तापमान ५ अंशांच्या खाली होते. फतेहपूरमध्ये पार १ अंश, चुरू येथे १.६ अंश सेल्सियस होता. राज्यात ५ जानेवारीपर्यंत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश : येथे ५ दिवस गार वारे वाहतील. राजधानी लखनऊत किमान पारा १८ अंश होता, जो सरासरीपेक्षा २.९ अंश कमी होता. ४ जानेवारीपर्यंत अनेक शहरांत कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.