आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासर्वत्र पसरलेली अस्वच्छता, रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी, अस्ताव्यस्त पडलेले उरलेले अन्न ही बकाल स्थिती आहे मंुबईनाका परिसरातील. मुंबईनाक्यावरील उड्डाणपुलाखाली गजराविक्रेत्यांनी अतिक्रमण करीत संसार थाटले आहेत. या विक्रेत्यांकडून पुलाखालीच आंघोळ, स्वयंपाक केला जाताे. त्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे, तसेच भांडी धुतल्यानंतर उरलेले सांडपाणीही रस्त्यावरच टाकले जात असल्याने या परिसरात दुर्गंधी निर्माण हाेत आहे.
या अतिक्रमणाकडे महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. मुंबईनाका परिसरात गजराविक्रेत्यांचे या अनधिकृत निवासस्थान कधी उठणार असा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत... मुंबईनाका परिसरातील उड्डाणपुलाखाली विविध फुलांची झाडे लावून सुशाेभीकरण करण्यात आले आहे.
मायलाॅन कंपनीने येथील सर्कलचे सुशाेभीकरण केले आहे. त्यामुळे या परिसराला आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून उड्डाणपुलाखालील माेकळ्या जागेत तसेच पदपथांवर गजरा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी अतिक्रमण करून तेथे थेट संसारच थाटले आहेत. तेथेच आंघोळ, स्वयंपाक, झोप आदी गोष्टी होत असल्याने पुलाखाली बकालपणा वाढला आहे. सांडपाणी व सर्वत्र पसरलेल्या कचऱ्यामुळे येथे दुर्गंधी निर्माण हाेत आहे. त्यामुळे वाहतूक बेटाने परिसराच्या सौंदर्यात भर पडलेली असताना दुसरीकडे गजरेविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे त्यास हरताळ फासला जात आहे. गजरेविक्रेत्यांची लहान मुले अनेकवेळा रस्त्याच्या कडेलाच खेळतात. कधी कधी ही लहान मुले दुचाकी आणि चारचाकीच्या पाठीमागे पळत असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चोरीच्या व अपघातग्रस्त वाहनांमुळे अडचण : चोरीची वाहने, अपघातग्रस्त वाहनांच्या वाढत्या भंगारमुळे मुंबईनाका पोलिसांना जागेची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे पाेलिसांकडून पोलिस ठाण्याबाहेर मदिना चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस ठाण्याचे गस्तीवरील वाहनेही याच भागात उभी केली जातात. एवढेच नव्हे, तर चक्क अपघातग्रस्त रिक्षाचा सांगाडाही मागील अनेक दिवसांपासून भररस्त्यात वाहतूक बेटाभोवती ठेवण्यात आला आहे.
वाहतूक कोंडीतही वाढ
अतिक्रमण वाढल्याने मुंबईनाका भागात रोज सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी अतिक्रमण वाढल्याने रस्ता अरुंद झालेला आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. - शोभित मोरे, नागरिक
लवकरच अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू होणार
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेंतर्गत मुंबईनाका भागातील अतिक्रमणावर कारवाई केली जाणार आहे. गडकरी चौक ते मुंबईनाक्यापर्यंत विशेष मोहीम राबवून सर्व अतिक्रमण काढण्यात येणार आहे. गजराविक्रेत्यांच्या या अनधिकृत निवाऱ्यावरही कारवाई केली जाईल. - राजाराम जाधव,विभागीय अधिकारी, पूर्व विभाग
महापालिकेकडून तक्रारींकडे दुर्लक्ष
मुंबईनाका परिसरातील अतिक्रमणासह अनधिकृत पार्किंग व बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला असतानाही या प्रश्नाकडे पोलिसांसह महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने समस्यांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईनाका भागातील अतिक्रमणांबाबत महापालिकेडे तक्रारी करुनही या भागात अतिक्रमण जैसे थेच आहे.
तसेच, द्वारका व मुंबईनाका परिसरातील वाहतूक कोंडी फाेडण्यासाठी पाेलिस प्रशासनाने वाहतूक व्यवस्थेतील बदलाची प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नसल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न आजही बिकट बनलेला आहे. त्यातच वाहतूक बदलानंतरही तसे कोणतेही सूचनाफलकच या भागात लावले गेले नसल्याने, खुद्द पोलिस प्रशासनालाच याबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून आले.
अतिक्रमणाकडे दुर्लक्ष
रुग्णालये, बसस्थानक, टॅक्सी, रिक्षा थांबे, महामार्ग, अंतर्गत रस्ते अशा सर्वच बाबींमुळे मुंबईनाका चौकात वाहतूक कोंडी हाेते. त्यात आता अतिक्रमणांची भर पडली आहे. दुकानदार अनधिकृतरित्या काही फेरीवाल्यांकडून दोन, पाचशे रुपये घेऊन त्यांना दुकानासमोरील रस्त्यावर त्यांचा हातगाडी, दुकान लावण्यास परवानगी देत असल्याचे चित्र आहे. याकडे मात्र महापालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.
परिसरात सर्वत्र अस्वच्छता
गजराविक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे बकाल स्वरूप प्राप्त झालेले आहे. विक्रेत्यांकडून या परिसरातच आंघोळ व स्वयंपाक केला जात असून संपूर्ण परिसरात अस्वच्छता पसरली आहे. - पप्पू डहाळे, नागरिक
विद्रुपीकरणात भर
उड्डाणपुलाखाली माेकळ्या जागेत विविध फुलझाडे लावून परिसर सुशाेभीत करण्यात आला आहे. मात्र, काही ठिकाणी माेकळ्या जागेत गजराविक्रेत्यांचे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात अतिशय विदारक दृश्य बघावयास मिळत आहे. त्यामुळे एकीकडे उड्डाणपुलाखाली शाेभेची झाडे लावून परिसराचे साैंदर्य वाढविण्याचा प्रयत्न केला जात असताना या विक्रेत्यांमुळे परिसर विद्रुप हाेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.