आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रीय हरित लवादाने गोदावरीचे पाणी पिण्यासाठी तर सोडा, आंघोळीसाठी अयोग्य असल्याचे सांगितल्यामुळे शहराचे वैभव मानल्या जाणाऱ्या दक्षिण गंगा अर्थातच गोदावरी नदीतील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून ही बाब लक्षात घेत नवनियुक्त आयुक्त किंबहुना प्रशासक रमेश पवार यांनी गोदावरीत सोडल्या जाणाऱ्या पावसाळी गटारीत सोडलेल्या सांडपाण्याच्या जोडण्या किती हे शोधण्याचे आदेश पर्यावरण विभागाला दिले आहेत.
साधारण पुढील पंधरा दिवसांत अशा जोडण्या शोधून प्रथम संबंधित नागरिकांना त्यामुळे पवित्र गोदावरीचे प्रदूषण कसे वाढत आहे याबाबत सजग केले जाणार आहे. त्यानंतर त्यांना स्वत: अशा जोडण्या खंडित करण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. त्यानंतरही न ऐकणाऱ्यांवर त्यांच्यावर दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांच्या जोडण्या खंडित केल्या जाणार आहेत.
गेल्या वीस वर्षांत गोदावरी नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी पाचशे कोटीहून अधिक निधी खर्च करण्यात आला. अलिकडेच स्मार्ट सीटी योजनेत गोदावरी शुद्धीकरण, सौंदर्यीकरण व सुशोभीकरणासाठी ५०० कोटींचा खर्च दोन टप्प्यात केला जाणार आहे. त्यासाठी प्रोजेक्ट गोदा हा प्रकल्प राबवला जात आहे. याच प्रकल्पात गोदावरीचे पात्र खोलीकरण करण्याबरोबरच रामकुंडाखालील भागात क्राँकिटीकरण काढून नदीपात्राखालील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्याचा प्रयत्न आहे.
मात्र कोट्यवधी रुपये खर्चून गोदावरीचे प्रदुषण थांबत नाही. मध्यंतरी, उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या अनुषंगाने ओता उपाययोजना करण्यात आल्या. निरीसारख्या तांत्रिक संस्थेकडून मार्गदर्शनही घेतले गेले मात्र, प्रदूषणाची तीव्रता काही कमी झालेली नाही. दरम्यान, पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपले प्रथम लक्ष्य गोदावरी असेल हे सांगितले होते. भूमिपुत्र म्हणून प्रथम गोदावरीचे प्रदूषण थांबवणे व सौंदर्यीकरण करण्याचा उद्देशही बोलून दाखवला होता. त्यामुळेच शहरातून जाणारे गोदावरीचे जवळपास १९ किमीचे पात्राला नेमके प्रदुषित करणारे स्त्रोत कोणते याचा शोध घेणे सुरू केले आहे.
दरम्यान, आता उन्हाळ्यात पावसाळी गटारीतून पाण्याचा थेंबही बाहेर पडणे शक्य नसताना गोदावरीत काळे पाणी कोठून येते याचाही पवार यांनी शोध घेतला. त्यात, पावसाळी गटारीत नागरिकांनी सांडपाणी सोडले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आता अशा नागरिकांनी प्रबोधन करून गोदावरीत सांडपाणी सोडू नये असे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर जे स्वत:हून अशा जोडण्या खंडित करणार नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.