आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकडवट हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसे व शिवसेनेत सुरू झालेल्या चढाओढीदरम्यान येत्या १५ जून रोजी राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे नवा अंक रंगणार असून या दौऱ्यात नाशिकमधील दिड हजार शिवसैनिकांना नेत जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी स्थानिक शिवसेना नेत्यांनी सुरू केली आहे. येत्या १३ तारखेला दिड हजार शिवसैनिक विशेष अयोध्या ट्रेनने रवाना होणार असून पूर्वतयारीसाठी प्रमुख नेते लवकरच अयोध्येत डेरेदाखल होणार आहेत. मे महिन्यात आदित्य ठाकरे यांचा अयोध्या दौरा जाहीर झाला होता. या दौऱ्याच्या तयारीसाठी शिवसेना संपर्कनेता तथा खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना अयोध्येला पाठवलेही होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा चांगलाच गाजला. त्यावरून मनसे व शिवसेनेत कलगीतुराही रंगला. त्यानंतर राज यांचा प्रकृतीच्या कारणास्तव दौरा रद्द झाला. दरम्यान, आदित्य यांचाही दाैरा १० जूनऐवजी १५ जूनपर्यंत पुढे ढकलला गेला. आता १५ जून रोजी हा दौरा होणे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे या दाैऱ्याच्या नियोजनासाठी नाशिक शिवसेना सक्रीय झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते संजय राऊत आणि शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रमुख विजय करंजकर,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर आणि माजी विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्याकडे प्रमुख जबाबदारी आली आहे. लवकरच हे पदाधिकारी अयोध्येला रवाना होणार आहे. नाशिकमधून दिड हजार शिवसैनिकांना येत्या सोमवारी विशेष ट्रेनद्वारे रवाना केले जाणार आहे. अयोध्या दौऱ्या संदर्भात स्थानिक शिवसेना नेते, कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात नाशिकहून जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याबाबत नियोजन करण्यात आले. त्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.