आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:‘रेमडेसिविर’ राजकारणावर पवारांची नाराजी; पण राजकारण करतंय कोण? सांगा रेमडेसिविरचा आमचा वाटा कुठं हाय हाे?

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सांगा आम्हाला बिर्ला, बाटा, टाटा कुठं हाय हो, सांगा धनाचा साठा न् आमचा वाटा कुठं हाय हो...
असा जळजळीत सवाल लोकशाहीर वामनदादा कर्डक यांनी व्यवस्थेला केला होता. आज ‘दिव्य मराठी’ पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या मनातला हाच प्रश्न एका वेगळ्या म्हणजे रेमडेसिविरच्या संदर्भाने राज्य शासनाला करत आहे. त्याला पार्श्वभूमी आहे ती अर्थातच भाजप महाराष्ट्रासाठी म्हणून आणू पाहत असलेल्या ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शनवरून तापलेल्या राजकारणाची. गेले तीन-चार दिवस या कोलाहलात त्या ५० हजार इंजेक्शनचे नेमके झाले काय, हा मूळ प्रश्न अजून अनुत्तरितच आहे आणि एवढ्या आणीबाणीच्या स्थितीतही ती गरजूंपर्यंत पोहाेचलेलीच नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे आता शरद पवार अशा राजकारणावर नाराज असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांच्याच राष्ट्रवादी पक्षाचे औषधमंत्री, गृहमंत्री, प्रवक्ते यांची परस्परविरोधी विधाने त्याच्या मुळाशी कशी आहेत, ते आपल्या आरशातून ‘दिव्य मराठी’ यानिमित्ताने दर्शवून देत आहे.

जनतेच्या मनातील खदखद व्यक्त करणारे ‘दिव्य मराठी’चे रोखठोक सवाल
राजकारण करू नका : शरद पवार

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. लोकांमध्ये अस्वस्थता आहे. नागरिकांना बेड मिळणे, औषध मिळणे हे महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत रेमडेसिविरसारख्या प्रश्नावरून राजकारण होऊ नये. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची ही वेळ नाही. या कठीण काळात सर्वांनी एकत्र येऊन कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीने मनापासून प्रयत्न करण्याची गरज आहे.

परवानगी माझीच : राजेंद्र शिंगणे
भाजपमार्फत येणारा तो रेमडेसिविरचा पुरवठा सरकारतर्फेच रुग्णांना वाटप केला जाणार होता. त्यासंदर्भात भाजपचे विरोधी पक्षनेते काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसह मला भेटले हे खरे आहे. निर्यातबंदीमुळे उत्पादकांकडे असलेली इंजेक्शन्स संकटकाळात राज्याला मिळतील या चांगल्या हेतूने मी त्यांना अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने राज्यातील वितरणाची परवानगी दिली होती.

भाजपचे राजकारण : नवाब मलिक
राज्यात कोरोनाचे गंभीर संकट असताना काही लोक राजकारण करीत आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. अशा वेळी भाजप केवळ राजकारण करीत असून पोलिसांत तक्रारी करीत आहे, राजीनामा मागत आहे, राज्यपालांना भेटत आहे... हे राजकारण त्यांनी थांबवावे.

आणलेला साठा गेला कुठे? : रेमडेसिविर उपलब्ध होत नाही. मग आतापर्यंत आणलेला साठा गेला कुठे, कोणत्या हॉस्पिटलला? कोणत्या संस्थेला? उर्वरित साठा कुठे आहे? याचा लेखाजोखा राज्य सरकारने दिला पाहिजे. आता राजकारण नाही, जीव जगणं महत्त्वाचं आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

साठेबाजीचा संशय : वळसे पाटील
मुंबईमध्ये रेमडेसिविर इंजेक्शनच्या ५० हजार कुप्या येत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. तो नियमबाह्य साठा असल्याच्या संशयावरून ब्रुक कंपनीच्या मालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले. कुणाचीही चौकशी करण्याचा पोलिसांना अधिकार आहे. पोलिसांवर दबाव टाकणे योग्य नाही. सरकारी कामात कुणाचाही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही.

‘दिव्य मराठी’चे राज्यकर्त्यांना प्रश्न
- राजकीय कोलाहलात रेमडेसिविरसाठी रुग्णांची तडफड व नातलगांची ससेहोलपट कधी थांबणार?
- राज्यात रेमडेसिविरच्या ७५ हजार कुप्या येणार असल्याच्या औषधमंत्र्यांनी चार दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेतील ती इंजेक्शन्स कुठे आहेत?
- भाजपचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्राला ५० हजार रेमडेसिविर देण्याचा दावा करीत होते, मग औषधमंत्र्यांच्या घोषणेतील ती इंजेक्शन्स हीच का?
- दमणच्या ब्रुक फार्मा कंपनीने ६० हजार रेमडेसिविरचा साठा केल्याची मुंबई पोलिसांची माहिती होती, तो हाच साठा आहे का?
- ती इंजेक्शन्स मुंबईत नाहीत तर दमणमध्ये आहेत या ब्रुक कंपनीच्या मालकांच्या म्हणण्यानुसार ती ५० हजार रेमडेसिविर महाराष्ट्रातील लोकांना आता कधी मिळणार?
- राज्यातील जनतेला चार दिवसांत रेमडेसिविर मिळणार असल्याचे सरकारचे म्हणणे होते, त्याला चार दिवस उलटून गेले. ती रेमडेसिविर कुठे आहेत?
- राजकीय नेते त्यांच्या मतदारसंघात रेमडेसिविरचे वाटप करत आहेत. या इंजेक्शनच्या खासगी वितरणावर बंदी असताना त्यांना इंजेक्शन्स कुठून मिळत आहेत? त्यांच्यावर औषधमंत्री व गृहमंत्री कारवाई का करत नाहीत?

बातम्या आणखी आहेत...