आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन वर्षांपूर्वी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. कारण सांगितले गेले शेती प्रश्नाचे आणि प्रत्यक्ष चर्चा झाली राज्यातील सत्तास्थापनेच्या शक्यतेची. आताच्या भेटीमागचे कारण सांगितले ते सहकारी बँकांवरील रिझर्व्ह बँकेचे निर्बंध व आगामी अधिवेशनाचे, मात्र खऱ्या शक्यता आहेत वेगळ्याच. पवारांची मुत्सद्देगिरी आणि मोदींची दूरदृष्टी या पार्श्वभूमीवर या भेटीमागे पाच ‘राजकीय’ शक्यता वर्तवल्या जात आहेत.
या आहेत शक्यता
1. राष्ट्रपतिपदाची निवडणूक
राष्ट्रपतिपद हे पवारांचे स्वप्न लपून राहिलेले नाही. दिल्लीतील वर्तुळात सर्व पक्षांसोबत ‘संवादी’ संबंध असलेले पवार हे एकमेव ज्येष्ठ नेते आहेत. प्रतिभा पाटील यांना ‘मराठी’पणाच्या मुद्द्यावर शिवसेनेने पाठिंबा दिला होता. प्रणव मुखर्जी यांच्याही बाजूने कौल दिला होता. ती शिवसेना तर या वेळी पवार यांच्या सोबत आहे.२०२२ मध्ये होणाऱ्या या निवडीत निर्णायक आहे ती भाजपची भूमिका.
2. महाराष्ट्रातील सरकार
काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी अशी मोट बांधून पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केले, पण सध्या आघाडीतील धुसफूस तीव्र झाली आहे. विशेषत: पुढल्या वर्षी होणाऱ्या मुंबई व महत्त्वाच्या महापालिका निवडणुका आणि नाना पटोलेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून सेना व राष्ट्रवादीविरोधातील काँग्रेसच्या राजकारणामुळे पवार नाराज आहेत. मोदीभेटीतून काँग्रेस, शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न आहे.
3. ‘ईडी’चे संकट : राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ईडीच्या अटकेच्या टांगत्या तलवारी आहेत. देशमुख यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.यांपैकी कोणत्याही नेत्याची अटक राष्ट्रवादीसाठी मोठी नाचक्की ठरणारी आहे. ती टाळण्यासाठी मोदीभेट पवारांना अनिवार्य आहे.
4. सहकारी कारखाने : अमित शहंाकडे केंद्रीय सहकार खाते गेल्याने राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे. बँक घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट देणारे पोलिस आयुक्त परमबीरसिंग भाजपच्या बाजूने गेले आहेत. जरंडेश्वरनंतर राज्यातील ४० कारखान्यांच्या चौकशीची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. हे थांबवायचे तर मोदींचा ‘आशीर्वाद’ हवाच.
5.अधिवेशनातील विधेयके : संसद अधिवेशनात येणारे कृषी व समान नागरी कायदा व त्यावरील भूमिकेच्या चाचपणीची सध्या राष्ट्रवादीला गरज आहे. सर्व भाजप विरोधकांना एकत्र आणण्यात पवारांची भूमिका व नेतृत्व लक्षवेधी ठरते आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील ‘चाली’ ठरवण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात चर्चेत राहणे ही पवारांसाठी कळीची गरज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.