आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • She Lit The Boat! Lost Leg In Train Accident, Denied Admission To MBBS Due To 95% Disability; Winning The Lawsuit Also Changed The Law, Now MD

तिने नाव 'रोशन' केले!:95% अपंगत्वामुळे MBBSला प्रवेश नाकारला; खटला जिंकत कायदाही बदलला, आता MD

जहीर शेख | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ध्येय साकार करण्याची जिद्द असेल तर परिस्थिती कशीही असो विजय निश्चित असतो, हे मुंबईच्या डॉ. रोशन शेखने सिद्ध करून दाखवले आहे. अपघातात तब्बल ९५% अपंगत्व आल्यानंतरही तिने एमबीबीएस करण्यासाठी कोर्टात खटला लढवला. तो जिंकून सरकारला कायदा बदलायला लावला. डॉक्टरची पदवी मिळवली. त्यानंतर मुंबईतील प्रतिष्ठित जी.एस. वैद्यकीय महाविद्यालयातून एम.डी. (पॅथॉलॉजी) पूर्ण केले. आता डॉ. रोशन ‘मोटिव्हेशनल स्पीकर' झाली असून संपूर्ण देशभरातील तरुणाईला प्रेरित करत आहे.

मुंबईच्या जोगेश्वरी भागात चाळीतील एका घरात भाड्याने राहणाऱ्या रोशनचे वडील रस्त्यावर भाजी विकण्याचा व्यवसाय करत होते. कुटुंबामध्ये आई-वडील, तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. लहानपणापासून रोशन अत्यंत हुशार होती. शालेय शिक्षणादरम्यानच तिने अनेक बक्षिसे मिळविली. रोशनने मार्च २००८ मध्ये झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९२.१५% गुण मिळवले. नंतर वांद्रे येथील अंजुमन इस्लाम गर्ल्स महाविद्यालय ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये प्रवेश घेतला. ७ ऑक्टोबर २००८ ला परीक्षा देऊन घरी परतत असताना अंधेरी-जोगेश्वरीदरम्यान गर्दीमुळे धावत्या लोकलमधून ती खाली पडली. यात तिला दोन्ही पाय गमवावे लागले. कृत्रिम पायांच्या आधारे तिने नव्याने जीवनाला सुरुवात केली आणि इयत्ता बारावीच्या परीक्षेत ७५.१७ टक्के गुण मिळविले.

पुढे एमबीबीएस करायचे होते. सीईटीत ती अपंगांच्या कोट्यातून तिसरी आली. मात्र, तिचे अपंगत्व ९५% असल्याचे सांगत मेडिकल बोर्डाने तिला अपात्र ठरवले. त्याविरोधात तिने २०११ मध्ये मुंबई हायकोर्टात दाद मागितली. एमबीबीएसला प्रवेश मिळण्यासाठी उच्च न्यायालयाने तिला संधी दिली. त्या वेळी न्यायमूर्तींनी तिची पुन्हा अपंगत्व चाचणी घेण्याचे मेडिकल बोर्डाला आदेश दिले. त्यानंतरही पुन्हा तिला मेडिकल बोर्डाने अपात्र ठरवले. मुख्य न्यायमूर्तींनी भर न्यायालयात रोशनला रॅम्पवर चालण्यास सांगितले. तिने न अडथळता सफाईने चालून दाखविले. ते पाहून न्यायमूर्तींनी मेडिकल बोर्डाचा आदेश फेटाळून लावत तिला एमबीबीएसला प्रवेश देण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला आदेश दिले.

त्यानंतर रोशनला जी. एस. मेडिकल कॉलेज व केईएम हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला. दरवर्षी प्रथम वर्गात उत्तीर्ण होऊन २०१६ मध्ये तिने एमबीबीएसची पदवी प्रथम वर्गात मिळवली. त्यानंतर एमडी ही (पॅथॉलॉजी) यशस्वीपणे पूर्ण केले.

बातम्या आणखी आहेत...