आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:मेंढपाळांनी खरेदी केली आदिवासींची 14 मुले, श्रमजीवी संघटनेचे मधे यांची ‘दिव्य मराठी’ ला माहिती

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगरसह लगतच्या परिसरात जिल्ह्यातील तब्बल १४ आदिवासी मुलांची खरेदी-विक्री झाली असून आता यातील एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तर ४ मुलांची सुटकाही आम्ही केल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे माजी जिल्हा सरचिटणीस भगवान मधे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

मधे म्हणाले, मेंढपाळांकडून अवघ्या १० ते २० हजार रुपयांत आदिवासी समाजातील लहान मुलांची खरेदी केली जाते. अहमदनगरसह लगतच्या जिल्ह्यांतील विटभट्टी किंवा ऊसतोड ठेकेदारांकडून ही खरेदी होते. या लहान मुलांकडून पुढे श्रमाची कामे करून घेताना त्यांना मारझोड व अत्याचारही केले जातात. उभाडे येथील मृत्यू झालेल्या या चिमुरडीने मृत्यूपूर्वी घडलेल्या सर्व प्रकाराचा सविस्तर जबाब दिला आहे. दरम्यान, या मुलीला घेऊन गेलेल्या मालकाच्या शेजारील गावातील एका मेंढपाळानेही एका मुलाला नुकतेच त्याच्या आई-वडिलांकडे परत आणून सोडले. लहानपणीच घेऊन गेल्याने मुलगा आई-वडिलांना अोळखत नाही. त्यांची भाषाही त्याला समजत नाही.

दरम्यान, नगरमधील संगमनेर, अकोले भागात हे प्रकार अधिक असल्याने संगमनेरच्या तहसीलदारांची भेट घेऊन वेठबिगार कायद्यानुसार त्यांची मुक्तता करून तसे दाखलेही घेतले आहेत. उर्वरित १० मुलांचाही शोध सुरू असल्याचेही मधे यांनी सांगितले.

सुटका केलेल्या चार मुलांसह ‘श्रमजीवी’ जिल्हाधिकाऱ्यांना भेटली इगतपुरी - मेंढपाळांना विकलेल्या ज्या चार मुलांची सुटका करण्यात आली त्यांना घेऊनच श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. राज्य सरकारने वेठबिगारी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, अशा घटनेतील वंचितांचे पुनर्वसन करत तसे दाखले देण्याची मागणी त्यांनी करत जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांच्यासह ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. श्रमजीवी संघटनेने म्हटले आहे की आता हे लाेण पालघर, वसई, ठाणे, मेळघाट, नाशिक, नगर या जिल्ह्यांत पोहोचले आहे. ज्या दहा मुलांचा शोध सुरु आहे त्यांची यादी संघटनेने प्रशासनास दिली आहे. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस विजय जाधव, बाळाराम भोईर, जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे, ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके, इगतपुरी तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम, सुनील वाघ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...