आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्रुपीकरण:शिंदेचा दाैरा अन‌् हाेर्डिंगचा भाेवरा ; शहराला अवैध हाेर्डिंगचा विळखा

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात सत्तांतरानंतर प्रथमच नाशकात आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी माेठ्या संख्येने अवैध हाेर्डिंग्ज लावत शहर विद्रुपीकरणात भर घालत असतानाच पाेलिस व मनपा यंत्रणेलाच आव्हान दिले आहे. मुंबई नाक्यावर तर पाेलिसांच्या नाकावर टिच्चून पाेलिस ठाण्याच्या आसपासच्या संपूर्ण परिसरातच होर्डिंगचा भोवरा पडला आहे. विशेष म्हणजे, शहराच्या विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या अवैध हाेर्डिंग्जविराेधात उच्च न्यायालयाने थेट कारवाईचे आदेश दिलेले असताना व तत्कालीन पाेलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी स्वतंत्र आदेश काढून थेट कारवाई केल्याने शहर हाेर्डिंग्जमुक्त केले हाेते. मात्र, आता या विद्रुपीकरणावर नूतन पाेलिस आयुक्त नेमके काेणाकाेणावर गुन्हे दाख ल करणार की विनापरवानगी हाेर्डिंग्ज परवानगी घेतल्याचे दाखविणार? असा सवाल उपस्थित हाेत आहे.

मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे हे प्रथमच शुक्रवारी नाशिक दाैऱ्यावर आले असताना त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी पाथर्डी फाट्यापासून ते महामार्गावरील उड्डाणपुलाखाली ठिकठिकाणी हाेर्डिंग्ज लावले. मुंबईनाक्यावर तर थेट पाेलिस ठाण्याच्या समाेरच वाहतूक बेटावर माेठे फलक लावून जणू पाेलिसांनीच स्वागत फलक उभारल्याचे चित्र हाेते. हे भले माेठे हाेर्डिंग वाहतुकीलाही अडथळा ठरत आहे. तरीही वाहतूक पाेलिसांची बघ्याची भूमिका कायम आहे. द्वारका, सारडा सर्कल, आडगावनाका अशा सर्वच ठिकाणी हाेर्डिंग्ज लावल्याने विद्रुपीकरणात भरच पडली आहे.

तरतुदी : आयुक्तालयांच्या हद्दीत कुठलेही समारंभ, वाढदिवस, नेत्यांचे स्वागत असाे की धार्मिक, दशक्रिया विधी अथवा व्यावसयिकांच्या जाहिरातींच्या फलकांना परवानगी आवश्यक.शिक्षेची तरतूद : कमीतकमी चार महिने तर जास्तीत जास्त एक वर्ष साधी कैद व दंडात्मक कारवाई.आदेशाचा विसर : तत्कालीन पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी २० सप्टेंबर २०२१ राेजी मुंबई पाेलिस अधिनियमानुसार परिपत्रक काढून अनधिकृत हाेर्डिंग्जबाबत थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश काढले हाेते. त्यानंतर शहर हाेर्डिंग्जमुक्तही झाले हाेते. मात्र, त्यांची बदली हाेताच शहरात पुन्हा अनधिकृत हाेर्डिंग्जने डाेके वर काढले आहे.

अवैध हाेर्डिंग्जविराेधात कारवाई
शहरात अवैध हाेर्डिंग्ज लागले असतील तर त्याची चाैकशी करून न्यायालयाचे आदेश आणि मुंबई पेलिस अधिनियमानुसार गुन्हे दाखल केले जातील. अनधिकृत हाेर्डिंग्जबाबत काेणाचीही गय केली जाणार नाही. तत्कालीन पाेलिस आयुक्तांनी काढलेले आदेशही रद्द केलेले नसल्याने कारवाई ही हाेणारच आहे.
- जयंत नाईकनवरे, पाेलिस आयुक्त

न्यायालयाच्या आदेशाचा अवमान
नाशिक शहरातील अवैध हाेर्डिंग्जविराेधात उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर न्यायलयाने शहर हाेर्डिंग्जमुक्त करण्याचा निकाल दिला हाेता. आठ वर्षांपूर्वीच्या या निकालात मनपा अतिक्रमण विभागास कारवाईचे स्पष्ट आदेश दिले आहेत. अनधिकृत हाेर्डिंग्ज लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यासह दंडात्मक कारवाईचे आदेश आहेत. सध्या मात्र अतिक्रमण विभागाचा बेजबाबदारपणा हा न्यायालयाच्या आदेशाचा अवमानच आहे. सामान्य नागरिकांनी तक्रारी केल्यात तर मनपाकडून तक्रारदाराचे नावे उघड करून संबंधित राजकीय अथवा गुन्हेगार धमक्या देतात.
- रतन लथ, याचिकाकर्ते

बातम्या आणखी आहेत...