आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक नंतर वाचा:पहिली ते आठवीच्या पुस्तकांचा तुटवडा; 2 दिवसांत पुरवठ्याचे बालभारतीचे आश्वासन

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवार (दि. १३) पासून प्रारंभ झाला असून उद्यापासून (दि. १५) विद्यार्थी शाळेत येणार आहेत. कोविडचा संसर्ग कमी झाल्याने दोन वर्षांनंतर यंदा शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार असल्याने विद्यार्थी-पालकांसह शिक्षकांमध्ये उत्साह आहे. मात्र, दुसरीकडे इयत्ता पहिली ते आठवीच्या इंग्रजी माध्यमासह मराठी, हिंदी व इतर माध्यमाच्या अनेक पाठ्यपुस्तकांचा पुरेसा साठा नसल्याने तुटवडा निर्माण झाला असून येत्या दोन-तीन दिवसांत पुस्तके उपलब्ध हाेतील, असे बालभारतीकडून सांगण्यात आले. पुस्तके मिळत नसल्याने विद्यार्थी तसेच पुस्तकविक्रेते हैराण झाले आहेत.

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) बाजारपेठेत विक्री करण्यासाठी आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत वितरणासाठी पुस्तकांची छपाई केली जाते. यंदा मात्र, बालभारतीकडे पुस्तकांचा पुरेसा साठा नसल्याने अनेक विद्यार्थी अजूनही पुस्तकांविना आहे. शालेय साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून बालभारतीकडे वारंवार मागणी करूनही त्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, बालभारतीकडे पुस्तक पुरवठ्याबाबत माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, तुटवडा असलेल्या पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली असून दोन-तीन दिवसांत ती उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे सध्या तरी शालेय साहित्याची विक्री करणारे रिटेल व होलसेल विक्रेते यांच्यासह विद्यार्थी व पालकांना पुस्तकांची प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

पुस्तके तत्काळ उपलब्ध करून द्यावीत
शाळा सुरू होत असल्याने विद्यार्थी व पालक पुस्तके घेण्यासाठी येत आहे. मात्र, आमच्याकडे पुस्तके उपलब्ध नाही. बालभारतीकडे वारंवार संपर्क करूनही त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांबरोबरच विक्रेतेही हैराण झाले आहे. - अतुल पवार, अध्यक्ष, नाशिक जिल्हा बुक सेलर असोसिएशन

जिल्ह्यातील ५ लाख विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळतील मोफत पुस्तके जिल्ह्यातील ४२३५ शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण शाळेच्या पहिल्याच दिवशी केले जाणार आहे. या अभियानांर्गत जि. प., मनपा, नगरपालिका तसेच अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. त्यासाठी १५ दिवसांपासून तयारी सुरू आहे. यात मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी माध्यमांसह एकात्मिक पाठ्यपुस्तकांचा समावेश आहे. - राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, जि.प.

पुस्तके लवकर उपलब्ध करावी
दोन वर्षे विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत होतो. या वर्षापासून शाळा सुरू होत आहे, मात्र पुस्तके उपलब्ध झालेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर पुस्तके उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.- दत्तात्रय मोरे, पालक

या पुस्तकांचा तुटवडा
बालभारतीने छपाई केलेल्या इयत्ता पहिली ते आठवीच्या इंग्रजी माध्यमासह मराठी, हिंदी व इतर माध्यमाच्या अनेक पुस्तकांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात माय इंग्लिश बुक (१५ हजार मागणी), इयत्ता पहिलीचे इंग्रजी व गणित (२० हजार), इयत्ता दुसरीचे इंग्रजीचे पुस्तक (२० हजार), इयत्ता चौथीचे सुलभ भारती (१५ हजार) यांसह सहावी, सातवी, आठवीमधील काही विषयांच्या पुस्तकांचा तुटवडा असून त्याची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदविण्यात आल्याची माहिती नाशिक येथील बालभारतीच्या भांडार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. येत्या दोन-तीन दिवसांत ही पुस्तके उपलब्ध होतील, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...