आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक शहरातील नागरिकांना रेल्वे तिकिटाच्या आरक्षणासाठी नाशिकराेड येथे जावे लागू नये यासाठी त्यांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने शरणपूर रोडवरील तिबेटियन मार्केट परिसरात रेल्वेचे तिकीट रिझर्व्हेशन कार्यालय सुरू केले आहे. मात्र, कार्यालयात आरक्षणाची केवळ एकच खिडकी सुरू असून इतर खिडक्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिकिटे काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातच जास्त गर्दी झाल्यास कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनच नागरिकांना तिकीट काढण्यासाठी खासगी एजंटकडे जाण्याचा सल्ला दिला जात आहे. कार्यालयाच्या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली असून त्यातून दुर्गंधी निर्माण हाेत असून येथे रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांना प्रचंड त्रासाचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मार्च महिन्यापर्यंत कार्यालय बंद करण्याच्या हालचाली सुरु असल्याने कार्यालयाकडे रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याची बाब डीबी स्टारच्या पाहणीत समोर आली आहे.
यावर डीबी स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत... नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून देशाच्या विविध राज्यांत जाण्यासाठी तिकीट आरक्षित करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, शहरातील लोकांना नाशिक रोडला येऊन तिकीट आरक्षित करणे त्रासदायक असल्याने रेल्वेकडून खास प्रवाशांच्या सोयीसाठी शरणपूर परिसरात रिझर्व्हेशन कार्यालय सुरू करण्यात आले आहे. दोन गाळ्यांमध्ये तिकीट आरक्षित बुकिंगचे काम चालते. पूर्वी येथे चार खिडक्या हाेत्या. मात्र, आता तीन खिडक्या बंद करण्यात आल्याने येथे तिकीट आरक्षणासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकच खिडकी सुरू असल्याने तेथे शेकडो नागरिकांची रांग लागल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी या ठिकाणी सकाळी तीन व दुपारी तीन, अशा सहा खिडक्या दिवसातून दोन वेळेस सुरू हाेत्या. त्यामुळे शहरातील नागरिकांना तिकीट काढणे सोयीचे ठरत हाेते. सकाळपासूनच कार्यालयात गर्दी : तिबेटियन मार्केट परिसरातील रेल्वेचे तिकीट रिझर्व्हेशन कार्यालयात सकाळपासूनच गर्दी होते. गर्दी झाली की कर्मचाऱ्यांकडून ‘वायटीएसके'' एजंटकडे तिकिटं काढण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे अनेक लोक त्या एजंटकडे जाऊन जास्त पैसे देऊन तिकिटे घेतात.
नागरिकांचा त्रास थांबवा अन् खिडक्या सुरू करा
शहरातील रेल्वे रिझर्व्हेशन कार्यालयात एकच खिडकी सुरू असल्याने नागरिकांची लागलेली माेठी रांग.
कार्यालयालाच कचराकुंडीचे स्वरूप
कार्यालयात प्रचंड अस्वच्छता
शहरातील रिझर्व्हेशन कार्यालय बंद करण्याचा विचार रेल प्रशानाकडून सुरू असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे कार्यालयात केवळ एक खिडकी सुरू असून याठिकाणी आता स्वच्छताही केली जात नसल्याचे चित्र आहे आहे. मागील काही दिवसांपासून कार्यालयातील कचराच फेकला गेला नसल्याचे कार्यालयातच प्रचंड घाण पडलेली दिसून आली.
तत्काळ तिकीट सेवा बंद
शहरातील रिझर्व्हेशन कार्यालय बंद करण्याचा विचार रेल प्रशानाकडून सुरू असल्यानेच केवळ एकच खिडकी सुरू असल्याचे एका कर्मचाऱ्याकडून सांगण्यात आले. पहाटे ५ वाजेपासून तत्काळ तिकीटसाठी रांगेत उभे राहूनही अनेकांना तिकिटे मिळत नाहीत. तसेच न सांगताच याठिकाणी तत्काळ तिकिटांची सेवा बंद करण्यात आल्याचे यावेळी समोर आले. एका तिकीटसाठी दीड ते दोन तास कार्यालयात वेटिंग करावी लागत असल्याचे चित्र आहे.
कार्यालयातील स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
या रेल्वेचे तिकीट रिझर्व्हेशन कार्यालयात प्रचंड अस्वच्छता पसरलेली आहे. कार्यालयात ठिकठिकाणी कचरा पडलेला असून कार्यालयाला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. - विलास खांडबहाले, नागरिक
कार्यालय बंद केल्यास आंदाेलन उभारले जाईल
तिबेटियन मार्केट परिसरातील रेल्वेचे तिकीट रिझर्व्हेशन कार्यालय मार्च महिन्यात बंद होणार असल्याने या कार्यालयाकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. कार्यालय बंद केले तर आंदोलन करू. - युवराज अहिरे, नागरिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.