आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारेल्वेगाडीचा दरवाजा उघडला नाही म्हणून शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नाशिकरोड रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक २ वर एका तरुणावर सहा तरुणांनी जीवघेणा हल्ला केला. यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी असून त्याच्या छाती आणि पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिकराेड रेल्वे पाेलिसांनी सहा संशयिताना ताब्यात घेतले आहे.
नाशिकरोड रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितू सतबीर मेहरोलिया (२२, रा फर्नाडिसवाडी) हा मनमाड येथे लग्नाला गेला होता. तो पहाटे पंजाब मेलने बसला. या ठिकाणी गाडीचा दरवाजा बंद करण्यात आला. यावेळी संशयित आरोपीने दरवाजा उघडण्यासाठी सांगितले असता, तो उघडला नाही. या कारणावरून गाडीमध्ये फिर्यादी जितू मेहरोलिया आणि संशयितात वाद झाला.
त्यानंतर संशयिताने फोन करून आपल्या साथीदारांना नाशिकरोड स्थानकात बोलावून घेतले. गाडी शनिवारी पहाटे चार वाजता नाशिकरोड रेल्वेस्थानकात थांबली असता संशयित आरोपी रोहन सुभाष जाधव, अनुराग ऊर्फ अनिल हिरे, विकास प्रकाश परदेशी, प्रथमेश ऊर्फ मोठ्या नेल्सन कसबे, विकास अरुण दोंदे, इस्लाम ऊर्फ माम्या हारुण सय्यद यांनी जितूला जबर मारहाण केली तर रोहन जाधव याने छातीवर, पोटावर धारदार हत्याराने वार करून जबर दुखापत केली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक दीपक काजवे, पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप भालेराव, दीपक निकम, संतोष उफाडे, पाटील, विलास इंगळे, शैलेंद्र पाटील, विजय कपिले यांनी तपास करीत सहाही संशयितांना ताब्यात घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.