आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इनिशिएटिव्ह:स्पाइस जेट विमानसेवा बंद; केंद्रीय मंत्री, खासदारांच्या चुप्पीमुळे संताप, विकासाच्या उड्डाणाला खीळ

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका बाजूला राज्यात व देशातही सत्ता, त्यात देशाच्या मंत्रिमंडळात नाशिकला स्थान, दाेन्ही खासदार सत्ताधारी पक्षांचे असतानाही नाशिकच्या विकासाला खीळ बसत आहे. असे असतानाही हे मंत्री, खासदार आणि १८ आमदार कुठेच दिसत नसल्याने नाशिककरांमध्ये आधीच संताप आहे. त्यात आता स्पाइस जेट या विमान कंपनीने चार शहरांकरिताची विमानसेवा बंद केल्याने आणि त्यात नाशिकचा समावेश असल्याने नाशिककरांच्या या संतापात भरच पडली आहे. शहरातील विविध क्षेत्रांतील प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही हा संताप प्रखर शब्दांत मांडला आहे.

‘दिव्य मराठी’ने याच विषयावर पुढाकार घेत आमंत्रित केलेल्या चर्चासत्रात एका बाजूला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर आैरंगाबाद येथे मंत्री भागवत कराड यांनी खासगी विमान कंपनीची आैरंगाबाद-हैदराबाद सेवा सुरू केली. मात्र, नाशिकमध्ये उडाण याेजना संपल्याचे कारण देत स्पाइस जेटकडून नियमित व पुरेसे प्रवासी असूनही दिल्ली, पुणे, अहमदाबाद, बेळगाव या शहरांकरिताची विमानसेवा बंद झाली आहे. याचा परिणाम शहराच्या आैद्याेगिक, कृषी, पर्यटन, शिक्षण, आराेग्य या सगळ्याच क्षेत्रांवर पडणार आहे. मात्र या विषयावर एकही लाेकप्रतिनिधी गंभीर कसा नाही? असा संतप्त सवाल या चर्चेत अनेकांनी व्यक्त केला.

व्हिजन नसल्याचा ठपका : नाशिकच्या विकासाचे पुढील वीस-पंचवीस वर्षांचे व्हिजन ठेवून नियाेजन व्हायला हवे, मात्र लाेकप्रतिनिधींकडे याबाबत काेणतेच व्हिजन नसल्याने नाशिकचा विकास खुंटल्याची भावना जी शहरवासीयांत चर्चिली जात आहे, तीच या प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केली.

नाशिकला जाणीवपूर्वक डावलले जातेय का ?
गेल्या काही वर्षांत नाशिकची सातत्याने पीछेहाट हाेत असून नवे उद्याेग आलेले नाही. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल काॅरिडाॅरच्या दुसऱ्या टप्प्यातही नाशिकचा अपेक्षित समावेश झालेला नाही. नाशिक-मुंबई महामार्गाची दुरवस्था झाली आहे. मात्र, एक लाेकप्रतिनिधी वगळता इतरांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही. सुवर्ण त्रिकाेणातील नाशिक मुद्दामहून डावलले जात असल्याचा संताप यावेळी या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

राजकीय दबावाचा संशय
गेल्या काही वर्षांत नाशिकला डावलून विशिष्ट शहराच्या विकासाकडे लक्ष दिले जात आहे, त्याकरिता जाणीवपूर्वक नाशिकला डावलले जात असून येथून प्रकल्प पळविण्याचा घाट घातला जात असल्याचा भविष्यातील धाेकाही या चर्चेतून समाेर आला. नाशिक विमानतळ सर्व सुविधांनी परिपूर्ण असतानाही येथून नियमित सेवा सुरू हाेण्याकडे राज्य सरकारकडूनही दुर्लक्ष हाेत असले तरी आमदार काय करत आहेत? असा सूर यावेळी व्यक्त झाला.

बातम्या आणखी आहेत...