आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी स्पाॅट रिपोर्ट:गाेदावरीतील फेस हटविण्यासाठी फवारा; अजब उपायाने प्रदूषणाचाच वाढता पसारा

जहीर शेख | नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तपाेवनातील मलनिस्सारण केंद्रातून सांडपाण्यावर अर्धवट प्रक्रिया केलेले पाणी गाेदावरीत साेडलेले आहे. या पाण्यावर माेठ्या प्रमाणात फेस येत आहे. हा फेस आणि हे घाण पाणी येथून पुढे वाहून जाण्यासाठी पालिकेने फवारे मारण्याचा अजबच उपाय येथे सुरू केला आहे. यामुळे मात्र घाण पाणी पुढे वाहून जात नाहीच तसेच हा फेसही परिसरात सर्वत्र उडत असल्याने तपाेवनात प्रदुषणात वाढच हाेत असल्याने नागरिकांसह भाविकांनी संताप व्यक्त केला आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोदावरी संवर्धन कक्ष उभारण्यात आला. गोदावरी नदी व परिसर स्वच्छ ठेवणे, अस्वच्छता करणाऱ्यावर कारवाई करणे आदी सूचना केल्या होत्या. मात्र, तपोवनात असलेल्या मलनिस्सारण केंद्रातून गोदावरीत पूर्ण प्रक्रिया न करता पाणी सोडले जात असल्याने प्रदुषणात माेठ्या प्रमाणात वाढ हाेत असल्याने आता पालिकेच्या अधिकाऱ्यांंवरच कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

आरोग्य धोक्यात...
औद्योगिक वसाहतीचे पाणी थेट नदीपात्रात जाते. त्याचबरोबर, मेटल फिनिशर कंपन्यांमधील दूषित पाणी मोठ्या प्रमाणात नदीपात्रात जाते. घरगुती सांडपाणीही नदीपात्रात मिसळले जाते. नासर्डी नदीपात्रातील सर्वच पाणी गोदावरीत मिसळते. यामुळे गोदावरीच्या प्रदूषणात भर पडली आहे.- प्रसाद सोनवणे, नागरिक

महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून तपाेवनात एमएलडीच्या प्लांट बांधला आहे. मात्र, असे असतानादेखील परिसरातून जमा झालेल्या मलजल पाण्यावर अर्धवटच प्रक्रिया केली जाते. घाण पाणी तसेच गाेदावरीत साेडले जाते. घाण पाणी आणि फेस माेठ्या प्रमाणात गाेदावरीत साचून राहताे. सर्वत्र पसरलेल्या या फेसाचे चित्र बर्फाळ आणि प्रेक्षणीय दिसत असले तरी त्याचे परिणाम अत्यंत गंभीर हाेत आहेत. हा फेस काढण्यासाठी पालिकेकडून येथे ठिकठिकाणी स्प्रिंकल्स लावण्यात आले आहे. त्याच्या फवाऱ्यामुळे हा फेस कमी न हाेता त्यात वाढच हाेत असून ताे हवेबराेबर परिसरात उडत असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे या परिसरात माेठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. पर्यटकांनाही दुर्गंधीतच फेसाळ गाेदावरीचे दर्शन घ्यावे लागते. या पाण्यामुळे नदीतील जैवविविधता नष्ट झाली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या निर्देशानुसार मलनिस्सारण केंद्रातून प्रक्रिया झाल्यानंतर नदीपात्रात सोडण्यात येणारे पाणी १० बायोऑक्सिजन डिझॉल्व्हड (बीओडी) असणे आवश्यक आहे. परंतु, पालिकेने ३० बीवोडीसाठी डिझाइन केले आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून नदीपात्रात सोडलेल्या पाण्याची तपासणी केल्यानंतर ३० बीवोडीच्या वरच आढळून येतात.

आयुक्तांना साेबत घेत तत्काळ पाहणी करताे
तपोवनातील मलनिस्सारण केंद्रातून संपूर्ण प्रक्रिया करून पाणी गोदावरीच्या पात्रात सोडले जाते. पाण्याचे प्रेशर जास्त असल्याने या ठिकाणी माेठ्या प्रमाणात फेस निर्माण होतो. हा फेस कमी करण्यासाठी स्प्रिंकलद्वारे दुसरे पाणी मारले जाते. या प्रकाराबाबत आयुक्तांसोबत पाहणी करताे. - विजय मुंडे, उपायुक्त, महापालिका (गोदावरी संवर्धन)

हवे तसे प्रयत्न नाहीत
गोदेच्या प्रदूषणाबाबत लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांकडून ही हवे तसे प्रयत्न होत नाही. हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल- गोविंद कांकरिया, नागरिक

अधिकाऱ्यांना जाग येत नाही
मलजलयुक्त पाण्यावर संपूर्ण प्रक्रिया न करता पाणी गोदे सोडल्याने दुर्गंधी पसरली आहे. पण अधिकाऱ्यांना जाग येत नाही. - गौरव पगारे, नागरिक

बातम्या आणखी आहेत...