आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्दयीपणाचा कळस:कंटेनरने कट मारल्यानंतर एसटी चालकाला फरपटत नेत चिरडले, लासलगाव बसस्थानकासमोरील घटना

लासलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील बसस्थानकासमोर एसटीला कंटेनरने कट मारल्यानंतर बसची पाहणी करण्यासाठी खाली उतरलेल्या एसटी चालकाला कंटेनर चालकाने धडक देत १०० ते १५० मीटरपर्यंत निर्दयीपणे फरपटत नेले. यात संदीप मांगुजी निकम या एसटी चालकाचा जागीच मृत्यू झाला. कंटेनरचालक फरार झाला आहे.

नाशिकसाठी बस (एमएच १४ बीई ३६४१) आगारातून घेऊन येताना स्थानकासमोर कंटेनरने (एमएच ४३ वाय ७४६३) बसला कट मारला. यानंतर कंटेनरचालक पळण्याच्या प्रयत्नात असताना हा अपघात घडला. कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो गुंजाळ पेट्रोल पंपासमोरील योगेश ऑटोमोबाइल्स व लतीफ स्प्रे पेंटिंग या दुकानात घुसल्याने दोन्ही दुकानांचे नुकसान झाले. त्यानंतर कंटेनरचालक कंटेनर सोडून फरार झाला.

लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून फरार कंटेनर चालकाचा तपास सुरू आहे. चालक, वाहक, कर्मचाऱ्यांनी घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, यतीन कदम, डी. के. जगताप यांनी नातेवाइकांची समजूत काढली. मृत निकम यांच्या नांदगाव तालुक्यातील आमोदे या मूळ गावी संध्याकाळी उशिरा अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.

मृत निकम यांच्या नातेवाइकांनी जोपर्यंत एसटीकडून मदतीचे आश्वासन लेखी मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिस आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावपळ उडाली.

गाडी थांबव रे.. तो मरेल रे.. असे सांगूनही तो थांबला नाही...
शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे मी वर्तमानपत्राच्या स्टॉलवर पेपर वाटणाऱ्या मुलांसमवेत गप्पा मारत असताना अचानक आरडाओरडा ऐकू आला. बसस्थानकाच्या दिशेने पाहिले तर चांदवडहून लासलगावकडे एक नारंगी रंगाचा कंटेनर वेगाने येत होता. कंटेनरच्या पुढील बाजूस एक व्यक्ती आपला जीव वाचावा म्हणून लटकलेल्या अवस्थेत होता. मात्र कंटेनर वेगाने असल्याने त्या व्यक्तीचा हात सुटल्याने तो अडकला व कंटेनरने त्याला सुमारे शंभर ते दीडशे मीटर फरफटत नेले. कंटेनर कुणालातरी फरफटत नेत धावत होता. एसटी कर्मचाऱ्यांसह नागरिक गाडी थांबव रे.. तो मरेल रे... कुणीतरी वाचवा रे... असे आेरडत पळत होते. हे पाहताच मी व माझा मित्र दीपक संसारे कंटेनरला थांबविण्यासाठी आडवा झालो, मात्र त्याने कंटेनर आमच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. आम्ही उडी मारून रस्त्याच्या कडेला पडल्याने आमचा जीव वाचला, मात्र त्या दुर्दैवी एसटी चालकाचा आमच्या दुकान समोरच मृत्यू झाला. आम्ही तातडीने त्या कंटेनर चालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने चालू गाडीतून उडी मारत तो पळाला. त्यानंतर कंटेनर दुकानांमध्ये घुसल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने त्याठिकाणी कोणीही उपस्थित नसल्याने जीवितहानी टळली.

लॉकडाऊनमध्ये खासगी ट्रकही चालवला, ओव्हरटाइम करून कर्जफेड
नांदगावमधील आमोदेचे संदीप निकम ५ वर्षांपासून लासलगाव आगारात सेवेत होते. नोकरीनिमित्त नाशकात स्थायिक होते. त्यांच्या पश्चात पत्नी व ३ मुली आहेत. बँकेचे कर्ज काढून त्यांनी घर घेतले. लॉकडाऊनमध्ये एसटी बंद असल्याने खासगी ट्रक चालवत कर्जाचे हप्ते फेडले. लांब पल्ल्याच्या गाड्यांवर रोज गेल्यास ओव्हरटाइम मिळेल व लवकर कर्जफेड होईल म्हणून शक्यतो लासलगाव ते तुळजापूर या गाडीवर ते चालक म्हणून जात. कमी वेळ झोपून अधिक काम करायचे असे त्यांचे सहकारी सांगतात. या घटनेनंतर आगारातील अनेक चालक व वाहकांना अश्रू अनावर झाले होते.

बातम्या आणखी आहेत...