आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या महिनाभरापासून प. सा. नाट्यगृहात सुरू असलेल्या ६१ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा ‘फायनल ड्राफ्ट’ या नाटकाच्या सादरीकरणानंतर समाराेप झाला. या स्पर्धेत एकूण २८ नाटके सादर झाली. काही नाटकांनी चर्चा घडवून आणली तर दरवर्षी ज्या संस्था आणि दिग्दर्शक स्पर्धेत लक्ष वेधून घेत हाेते, त्यांनी मात्र यावर्षी निराशा केल्याची चर्चा रंगकर्मींमध्ये रंगली हाेती. दरम्यान, येत्या दाेन-तीन दिवसांमध्ये या स्पर्धेचा निकाल जाहीर हाेण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून मंगेश नेहरे, विश्वास पांगारकर, किरण अडलमाेले यांनी काम बघितले.
राज्य नाट्य स्पर्धेला १९ नाेव्हेंबरपासून सुरुवात झाली. या स्पर्धेत यंदा अनेक नाटकांनी लक्ष वेधून घेतले. त्यात ‘खिडक्या’ या नाटकाने स्पर्धेत विशेष रंग भरले. त्याचप्रमाणे चांदणी, इशक का परछा, उदकशांत, शीतयुद्ध सदानंद, साैभाग्यवती चिरंजीव, फायनल ड्राफ्ट या नाटकांची रसिकांमध्ये चर्चा हाेती. या नाट्य स्पर्धेत यंदा जवळपास सर्वच संघांनी नाटक सादर करताना नेपथ्य आणि प्रकाशयाेजनेकडे विशेष लक्ष दिल्याचे प्रकर्षाने दिसून आल्याने त्याचा नाटकाच्या सादरीकरणावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले. यातील जवळपास सगळ्याच नाटकांना कलाकार, रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला हाेता.
दरम्यान या स्पर्धेत शेवटच्या दिवशी सकाळी अभिजित कार्लेकर लिखित, दिग्दर्शित ‘रिबाऊंड’ हे नाटक सादर झाले. माणूस अकेनदा इतरांचे वाईट चिंतताे, मात्र कधीतरी तीच वेळ स्वत:वरच येते, या संदर्भातील सामाजिक संदेश ‘रिबाऊंड’ या नाटकाने दिला. या नाटकात पवन थापेकर, धीरज भदाणे, यश रसाेळकर, गणेश क्षत्रिय, भाग्यश्री ठाकूर, प्रतीक साेनवणे, प्रचिती नाईक, रेवा सराेदे, शर्विल राॅय, मनीषा क्षत्रिय, प्रथमेश चाैधरी यांच्या भूमिका हाेत्या.
तर संध्याकाळी पंचवटीतील अंबिका चाैक सेवाभावी संस्थेने गिरीश जाेशी लिखित, राजेश शर्मा दिग्दर्शित फायनल ड्राफ्ट हे नाटक सादर केले. प्राध्यापक आणि विद्यार्थिनी यांच्यातील चढउतारातील संवाद, नातेसंबंध, मानसिकता, व्यक्तिमत्त्व, अविर्भाव आणि त्यातून कधी सकारात्मकता तर कधी नकारात्मकता उमटत असतानाच या कथेचा जाे फायनल ड्राफ्ट तयार हाेेताे त्याची गाेष्ट या नाटकातून दाखविण्यात आली हाेती. राजेश शर्मा आणि माधुरी पाटील यांच्या त्यात भूमिका हाेत्या. तर नाटकाचे नेपथ्य शैलेंद्र गाैतम, संगीत मधुरा तरटे, शुभम शर्मा, प्रकाशयाेजना विनाेद राठाेड, रंगभूषा माणिक कानडे यांची हाेती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.