आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • State President Chandrasekhar Bawankule Appealed To The Workers To Create Strength So That Thackeray Will Not Get A Candidate With Congress, NCP

काँग्रेस, राष्ट्रवादीसह ठाकरेंना उमेदवार मिळणार नाही, अशी ताकद निर्माण करा:प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. प्रत्येकाने 20 घरे जोडण्याचे काम करावे. 2024 च्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटाला उमेदवारही मिळायला नको एवढी ताकद निर्माण करून पक्ष बांधणी करायची आहे.

जिल्ह्यातील सर्व 456 जागा जिंकायच्या आहेत. भुजबळांना पराभूत करायचे आहे. त्यामुळे युवा वारीयर्सच्या माध्यमातून युवाशक्ती निर्माण करून मन आणि मत परिवर्तन करण्यासाठी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर रविवारी (दि. 11) बावनकुळे प्रथमच नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांच्या उपस्थितीत येथील स्प्लेंडर हॉलमध्ये जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयाेजित करण्यात आला हाेता. लोकशाहीमध्ये ज्या पक्षाचे लोकप्रतिनिधी जास्त तो पक्ष मोठा असतो. आगामी निवडणुकीत दोन्ही खासदार, जिल्ह्यातील पंधरा आमदारांसह महापालिका, जिल्हा परिषद आपलीच राहील, यात शंका नाही. युवती, महिलांनीही त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असून जिल्ह्यातील 456 कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

प्रत्येक कार्यकर्त्याने 20 घरे जोडण्याचे नियोजन करण्याचा संदेश नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजप हे एक कुटुंब आहे. प्रत्येकाने कुटुंबाचा सदस्य म्हणून काम करताना पक्षाचा अधिकाधिक विस्तार कसा होईल यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आ​​​​​​​हे. नाशिकमध्ये शत प्रतिशतचा नारा देत आगामी महापालिका निवडणुकीत हंड्रेड प्लसचा तर विधानसभा निवडणुकीसाठी 200 प्लसचा दावा बावनकुळे यांनी केला.

व्यासपीठावर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, रवींद्र अनासपुरे, प्रदेश सरचिटणीस आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, विजय साने, जगन पाटील, माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर त्यांचा शहरात पहिलाच दौरा असल्याने उत्साही कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात त्यांच्या स्वागतासाठी फलक उभारले होते.

बातम्या आणखी आहेत...