आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयमाचा पुढाकार!:निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रम वाढविण्यासाठीचे पाऊल, 25 जणांच्या पहिल्या बॅचचा शुभारंभ

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (आयमा) च्या पुढाकाराने आणि सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या एक्सपोर्ट मॅनेजर प्रोग्रॅम अभ्यासक्रमाच्या पहिल्या बॅचचा शुभारंभ करण्यात आला. यात 25 जणांचा समावेश होता.

नाशिकमधून मोठ्याप्रमाणात निर्यातदार घडविणे तसेच निर्यातीसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, कोणत्या वस्तूंची कोणत्या देशात निर्यात करावी, त्याबाबत येणाऱ्या अडचणी,कायदेशीर बाबी याचे सखोल ज्ञान जिल्ह्यातील उद्योजकांना उपलब्ध करून देण्याचा उद्देश या अभ्यासक्रमामागे आहे.

सुरू झालेल्या या निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रमामुळे निर्यातदार घडविणारी नाशिक ही राज्यातील मोठी भूमी ठरेल. नाशिकचे उद्योजक खूप मेहनती आणि काळानुरूप बदलणारे तंत्रज्ञान आत्मसात करणारे आहेत. निर्यातीच्या क्षेत्रातही नाशिकने आपला ठसा उमटविला आहे. कांदा आणि द्राक्षांची मोठ्याप्रमाणात निर्यात करून करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. वाईन उद्योगातही आपण आघाडीवर आहोत, अन्य उत्पादनांचीही मोठ्या प्रमाणात निर्यात होते आणि आता या अभ्यासक्रमामुळे निर्यातदारांना कुशल ज्ञान मिळणार असल्याने हा दुग्धशर्करा योगच म्हणावे लागेल असा विश्वास आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ यांनी यावेळी व्यक्त केला.

व्यासपीठावर आयमाचे सरचिटणीस ललित बूब, सिम्बॉयसिसच्या डीन वंदना सोनवणे,आयमाच्या निर्यात विषयक समिती अध्यक्ष हर्षद ब्राह्मणकर, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे , देवेंद्र राणे, जगदीश पाटील, कुंदन डरंगे, रत्ना पळुरी, मनिषा बोरसे आदी होते.

सरचिटणीस ललित बूब यांनी यावेळी मार्गदर्शन केले, आयमाच्या निर्यात विषयक समितीचे चेअरमन हर्षद ब्राह्मणकर यांनी निर्यात क्षेत्रात नाशिकला असलेल्या संधींबाबत माहिती दिली.

चार महिन्यांचा हा अनोखा अभ्यासक्रम असून पहिल्या टप्प्यात 25 उद्योजकांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. दोन वर्षांत 200 जणांना या कार्यक्रमांतर्गत सामावून घेण्यात येणार असल्याचे सिम्बॉयसिसच्या डीन वंदना सोनवणे यांनी सांगितले. दर 15 दिवसांनी रविवारच्या दिवशी हा वर्ग घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...