आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबड औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांचे मजबुतीकरण करा:रस्त्यांच्या दुरावस्थेने वैतागलेल्या उद्याेजकांची प्रशासनाकडे मागणी

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड औद्योगिक वसाहत आणि परिसरातील रस्त्यांना मोठमोठे खड्डे आणि काही ठिकाणी पावसाच्या पाण्याने निर्माण झालेले तळे यामुळे उद्याेजक- कामगार अक्षरश: वैतागले आहेत. मात्र पावसाने उघडीप देताच महापालिकेची यंत्रणा कामाला लागल्याने उद्याेजकांना काही अंशी दिलासा मिळाला असून संबंधित यंत्रणांचे उद्याेजकांनी आभार मानतांनाच या रस्त्यांची सदैव अशीच दुरावस्था होत असलेल्याचे वास्तव लक्षात घेत या रस्त्यांचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करावे आणि हे सर्व रस्ते ट्रीमेक्सचे व्हावे अशी मागणी अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(आयमा)ने केली आहे.

अंबड औधोगिक वसाहत परिसरातील रस्त्यांची डागडुजी आणि खड्डे भरण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. आयमाच्या मूलभूत समितीचे चेअरमन हेमंत खोंड आणि सचिव सचिव गोविंद झा यांच्यासमवेत अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी पाहणी केल्यानंतर पांचाळ बोलत होते. या कामांमुळे निर्माण झालेल्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यास वाहतूक पोलिसही मोठया प्रमाणात तैनात करण्यात आले होते.

हजारो हातांना काम

सातपूर नंतर सर्वात मोठी औद्योगिक वसाहत म्हणून अंबडकडे बघितले जाते. अनुकूल वातावरण आणि मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा असल्याने अनेक नामांकित कंपन्या येथे आल्या आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू झाले आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेचे उत्पन्न तर वाढलेच परंतु निर्यातीलाही चालना मिळाली आहे. हजारो हातांना कामही उपलब्ध झाले. मात्र त्या तुलनेने या भागातील रस्त्यांची अवस्था म्हणावी तशी चांगली नाही.

दरवर्षीचे दुखणे

औद्योगिक वसाहत म्हटली म्हणजे या परिसरातील रस्ते अत्यंत मजबूत असणे गरजेचे आहे. कारण उद्योजकांना त्यांच्या उत्पादनाची ने-आण तसेच वाहतूक याच रस्त्यांवरून करावी लागते. परंतु दुर्दैवाने या प्रश्नाकडे संबंधित यंत्रणांचे आतापर्यंत दुर्लक्षच झालेले आहे. दरवर्षी रस्ते नादुरुस्त होतात आणि त्याची डागडुजी असा सिलसिला वर्षांनुवर्षे सुरू आहे. खड्यांमुळे वाहतुकीला खोळंबा होतो तसेच अपघातांनाही निमंत्रण मिळत आहे.

प्रमुख रस्ते ट्रीमॅक्सचे करावे

एक्सलो पॉईंट, गरवारे पॉइन्ट, ग्यासन ते ग्लॅकसो मार्ग तसेच पॉवरहाऊस ते अंबडगावचा मधला पॅच हे मुख्य रस्ते तसेच अंतर्गत सर्व रस्ते कायमस्वरूपी मजबूत म्हणजे ट्रीमॅक्सचे करावेत अशी आमची आग्रही मागणी असून महापालिका तसेच संबंधित सर्व यंत्रणांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अशी मागणी आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...