आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीकर थकबाकी मुदतीत न भरल्यास कठोर कारवाई:जीएसटी सहआयुक्त हरिश्चंद्र गांगुर्डे यांची शिष्टमंडळाला माहिती

नाशिक19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वस्तू व सेवा कर विभागाच्या (जीएसटी) अभय योजनेकरीता 30 सप्टेंबर ही शेवटची तारीख असून विक्रीकर थकबाकीदारांना ही शेवटची संधी आहे. विक्रीकर थकबाकीदारांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. संबंधित थकबाकीदार करदात्यांकरिता ही शेवटची संधी असणार आहे यानंतर मात्र पुढे होणाऱ्या कठोर कारवाईस सामोरे जावे लागू शकते अशी माहिती जीएसटी (राज्य) सहआयुक्त हरिश्चंद्र गांगुर्डे यांनी दिली.

टॅक्स प्रॅक्टीशनर्स असाेसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे, नाॅर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असाेसिएशनचे अध्यक्ष अनील चव्हाण, याेगेश कातकाडे आदी पदाधिकाऱ्याच्या शिष्टमंडळाने गांगुर्डे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी गांगुर्डे यांनी ही माहिती दिली.

योजना उपयुक्त ठरणार

अभय योजना ही नोंदणीकृत व्यापारी, अनोंदणीकृत व्यापारी, त्रस्त या सर्वांसाठी असून या योजनेची सुरुवात 1 एप्रिल 2022 पासून झालेली असून 30 सप्टेंबर 2022 ही शेवटची तारीख असणार आहे. विक्रीकर थकबाकीदार करदात्यांची संख्या व प्रकरणे मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहेत या प्रकरणांचा न्याय निवाडा करण्यासाठी राज्य सरकारने अभय योजनेची 1 एप्रिल 2022 पासून सुरुवात केली. कोरोना नंतरच्या काळात व्यापार उद्योग सावरत असताना त्यांना आणखीन दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने ही योजना आणली आहे. वसुली करून आस्थापनांना चालू प्रवाहात आणण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे. या योजनेनुसार आस्थापनांनी थकबाकीची काही रक्कम भरल्यास उर्वरित रकमेत सवलत मिळणार आहे त्यामुळे विक्रीकर थकबाकीदार करदात्यांना या संधीचा फायदा होणार आहे.

कोट्यावधी रुपयाची वसूली

नाशिक विभागात 1 लाखाहून अधिक करदाते अस्थापणे आहेत. त्यातील काही हजाऱ्याच्या पटीतील आस्थापनांकडे कर थकबाकी आहे त्यातील काही प्रकरणातील कर वसुली झाली. असून मोठ्या प्रमाणात कर माफी देखील दिली आहे. या प्रकरणातील प्रत्येकी 10 हजारांपर्यंतची थकबाकी माफ करण्यात आली आहे त्या पुढील थकबाकी असणाऱ्यांकडून जीएसटी विभागाकडून अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. या योजनेबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी जीएसटी कार्यालयात करदात्यांनी संपर्क साधावा. करदात्यांना मदतीसाठी amnestyhelpdesknashik@ gmail.com व विस्तृत माहितीसाठी www.mahagst.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. याचबरोबर कायदेविषयक किंवा तांत्रिक अडचणी असल्यास करदाते नोडल अधिकारी यांच्याशी 0253 - 2335171 या क्रमांकावर संपर्क करावा असे गांगुर्डे यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...