आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अग्निपथ’च्या विरोधात स्टुडंट‌्स फेडरेशनचे पदाधिकारी रस्त्यावर

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय सैन्यदलात भरतीसाठी नव्याने लागू केलेली ‘अग्निपथ’ योजना तरुणांसाठी अत्यंत मारक असल्याने ही देशविरोधी योजना तत्काळ रद्द करावी यासाठी ऑल इंडिया स्टुडंट‌्स फेडरेशन व ऑल इंडिया यूथ फेडरेशनने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला.

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान व राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले. २०२१-२२ मध्ये फक्त चार फेऱ्या संरक्षण विभागामार्फत राबविण्यात आल्या होत्या. कोविड प्रादुर्भाव कमी झाल्याने भरती प्रक्रियेला गती मिळेल या आशेने देशातील लाखो तरुण-तरुणी सैन्यदलात सहभागी होण्याचे स्वप्न मनोमन बाळगून त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत होते. परंतु केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात सैन्यदल भरतीप्रक्रियेत आमूलाग्र बदल आणत भरतीचे एकूणच स्वरूप बदलून टाकल्याने युवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

अनेक ठिकाणी या असंतोषाचे हिंसेत रूपांतर होऊन परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत आहे. सैन्यदलात चार वर्षांचे कंत्राट लागू करून आपण भारतीय सार्वभौमत्वासोबत समझोता करत आहोत. प्रस्तावित अग्निपथ योजना ही देशविरोधी असून आधीच बेरोजगारीच्या बोजाखाली दबलेल्या तरुणांना निराशेच्या गर्तेत ढळणार आहे. त्यामुळे ही योजना त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनप्रसंगी भीमा पाटील, तल्हा शेख, जयंत विजयपुष्प, प्राजक्ता कापडणे, कैवल्य चंद्रात्रे, कैफ शेख, प्रज्ञा साळवे, मुक्ता कावळे, इंद्रसिंग पावरा, दीक्षा साळवे, अल्फिया शेख, सागर जाधव, प्रणाली मगर, दानिश सय्यद, गायत्री मोगल, सिद्धार्थ जाधव, स्वामिनी बेंडकुळे, संकेत सीमाविश्वास आदी उपस्थित होते. मागणी पूर्ण करण्यासाठी वेळप्रसंगी आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आला.