आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमधील आदर्श बाल विद्यामंदिरात शिकलेल्या विद्यार्थ्यांची सुमारे ४० वर्षांनंतर पुनर्भेट झाली. निमित्त हाेते माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे. सर्वजण वयाची पन्नाशी पार केलेले, कोणी व्यावसायिक, कोणी राजकारणी, कोणी उच्चपदस्थ नोकरदार, कोणी शिक्षक, कोणी समाजसेवक तर कोणी डाॅक्टर. प्रशांत दिघे, शांताराम पाटील, महेश वायडे यांच्या संकल्पनेतून या विद्यार्थ्यांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार झाला. या ग्रुपच्या माध्यमातूनच स्नेहमेळाव्याची कल्पना अवतरली.
शाळेच्या शिक्षिका सुमंगल कुलकर्णी, शैलजा कुलकर्णी, युवराज पाटील या गुरुजनांना भेटून शाळेतील स्नेहमेळावा निश्चित झाला. प्रशांत दिघे, महेश वायडे, विजया निकम-दुधारे, मेधा कोल्हटकर-वाड यांच्या नेटक्या नियोजनातून हा स्नेहमेळावा साकारला. शाळेच्या आवारात प्रवेश करताच अनेक आठवणी उचंबळून आल्या. सर्वचजण जणू प्राथमिक शाळेतील विद्यार्थी असल्यासारखेच वाटत होते. अनेक वर्षांनंतर भेटल्यानंतरच्या गळाभेटी, हास्यकल्लोळ, एकमेकांची खेचाखेची, पुसट झालेल्या आठवणींना उजाळा देऊन गेले. भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली. अविरत गप्पांत सारेच हरवून गेले.
सुमंगल कुलकर्णी (७५), युवराज पाटील (६५) या गुरुजनांकडून सकारात्मक ऊर्जा घेतली. सुमंगल कुलकर्णी यांनी सर्वांना अत्तराची कुपी भेट दिली, शैलजा कुलकर्णी प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु त्यांनी पत्राद्वारे सर्वांना आशीर्वाद दिले. उपस्थित वर्गमित्र-मैत्रिणींनी स्वतःचा सध्याचा परिचय करून देताना शालेय जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत सर्वांना थेट ४० वर्षे मागे नेले. तेव्हाची शाळेची वर्गरचना, मुख्याध्यापकांचे ऑफिस, स्टेज, मैदान, खेळणी जसेच्या तसे डोळ्यांसमोर उभे राहिले. त्याचबरोबर सद्यस्थितीत आपण एकमेकांना कसे उपयोगी पडू शकू यावर चर्चाही घडून आली.
दिवसभर असलेल्या स्नेहमेळाव्यास शिवाजी कऱ्हाडे, कीर्तीकुमार शहा, नितीन घमंडी, महेश वायडे, प्रमोद कुऱ्हे, चेतन भरवीरकर, प्रशांत दिघे, किशोर कटारिया, प्रसन्न शिंदोरे, अपर्णा सोपे-नलावडे, विजया निकम-दुधारे, मेधा कोल्हटकर-वाड हे उपस्थित होते. गिरीश देशपांडे, शांताराम पाटील, नीता सौंदाणकर-सरदेसाई, दीपा डांगरीकर-भिडे, सोनाली पाटील-देशमुख यांनी बाहेरगावाहून येऊन सर्वांचा आनंद द्विगुणित केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.