आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:प्रतिकूल परिस्थितीशी झगडत यशाला गवसणी ; या मुलांवर सगळ्यांना गर्व आहे... म्हणून आजच्या हेडलाइनमध्ये यांचीच नावे...

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिता : पैसे नसल्याने सोडणार होती शाळा; मिळविले ७८%

तीचे आई-वडील एका पोल्ट्रीफार्मवर मोलमजुरी करतात. त्यावरच कुटुंबाची कशीतरी गुजराण होते. त्यामुळे शाळेची फी भरणेच काय तर वह्या-पुस्तके आणि इतर वस्तू घेणेही कठीण. खासगी शिकवणी तर लांबच. परिस्थितीच्या याच दुष्टचक्रामुळे तिला कॉलेज सोडावे लागणार होते. मात्र, वडिलांनी कॉलेजमध्ये विनंती केली आणि आज तिने कॉलेजने दिलेल्या संधीचे सोने करत ७७.८० टक्के गुण मिळविले. वडझिऱ्याची अनिता जगन वाडगे हिचा हा संघर्ष. शिक्षणाला पैसेच नाहीत म्हणून वडील जगन वाडगे यांनी एसएसके महाविद्यालयाचे प्रमुख संग्राम कातकाडे, सचिव कुणाल कातकाडे यांच्याकडे अनिताच्या शिक्षणासाठी आर्थिक सवलत देण्याची विनंती केली. कातकाडे यांनी ती मान्यही करत तिला अभ्यासासाठी पुस्तकेही उपलब्ध करून दिली. त्यात कोरोनात कॉलेज बंद असल्याने शिक्षकांनी जादा तासिकांवर भर दिला एकही जादा तास अनिताने सोडला नाही. अभ्यासात ती चांगली होतीच. त्यामुळेच तिने संचालकांचा विश्वास सार्थ ठरवला. ७७.८० टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली. यावेळी तिच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले होते.

कौसल्या : खो-खोचा अखंड सराव, क्लास नाही, ७७% गुण

{खो-खोच्या मैदानात सर्वांचे लक्ष वेधून घेणारी राष्ट्रीय खो-खोपटू कौसल्या पवार बारावीच्या परीक्षेतही विजयी झाली आहे. परीक्षेच्या कालावधीतही रोज अखंड सराव चालू होता. तसेच राष्ट्रीय स्पर्धेच्या शिबिरांमुळे अनेक दिवस कॉलेजलाही जाऊ न शकणाऱ्या कौशल्याने बारावीत ७७.१७ टक्के गुण मिळविले. एवढेच नाही तर श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दुसरा क्रमांकही पटकावला. खो-खोची आवड असणारी कौसल्या ही मूळची सुरगाण्याची. मात्र, गेल्या चार वर्षांपासून प्रबोधिनीत सराव करत आहे. ऑलराउंडर असलेल्या कौसल्याने राज्यस्तरीय, राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली आहे. खो-खोचा सराव करताना तिने अभ्यास सुरू ठेवत कोणताही क्लास न लावता यशाला गवसणी घातली. खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघातर्फे ती आता हरियाणात आहे. निकालही तिने खेलो इंडियाच्या मैदानातून पाहिला. या यशाबद्दल जिल्हा खो-खो असो.चे अध्यक्ष विश्वास ठाकूर, रमेश भोसले, आनंद गारमपल्ली, मंदार देशमुख व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

कुणाल : दिवसा गवंडीकाम रात्रभर अभ्यास : ५४% गुण

{वडील मजुरी करतात. तो स्वत: गवंडीकाम करतो. दिवसा काम आणि रात्री अभ्यास. केवळ जिद्द आणि चिकाटीमुळे आज त्याने बारावीला ५४ टक्के गुण मिळविले. ही कहाणी आहे इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील कुणाल शिंदे याची. दहावीनंतर कुणालने इगतपुरीतील गोवर्धने महाविद्यालयात सायन्स शाखेत प्रवेश घेतला. अकरावीत असताना एनसीसीमध्येही तो होता. मात्र पुढे काही कारणाने त्याला विज्ञान शाखा सोडून कला शाखेत यावे लागले. शिक्षण सुरू असतानाच ताे गवंडीकाम करू लागला. अभ्यासात मात्र खंड पडू दिला नाही. त्याने एनसीसी ट्रेनिंगमध्ये राष्ट्रीयस्तरावर नैपुण्य मिळवल्याने त्याची निवड केरळच्या ट्रेकिंग कॅम्पसाठी झाली आहे. त्याला प्राचार्य डॉ. पी. आर. भाबड , प्रा. देवीदास गिरी, प्रा. एस. एस. परदेशी, प्रा. एस. बी. फाकटकर यांचे मार्गदर्शन लाभले.

दीक्षा : परीक्षेच्या २ दिवस आधी वडिलांचे निधन; दु:ख बाजूला सारत मिळविले ७७%

{दाेन दिवसांवर बारावीची परीक्षा आल्याने सिन्नरच्या शेठ ब. ना. सारडा येथील दीक्षा एकही क्षण वाया न घालवता अभ्यास करत हाेती. मात्र, त्याचवेळी तिचे वडील महेश कुलकर्णी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. बाप आणि लेकीचं नातं किती घट्ट असतं हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच दीक्षाही खूप दु:खी झाली. मात्र आईनेच तिला दुःख बाजूला सारून परीक्षेची तयारी करण्याचा धीर दिला. एकूणच वातावरणामुळे अभ्यासावर काहीसा परिणाम झाला. मात्र नातलग, शिक्षक धीर देत होते. आजारापणामुळे वडील कायम घरात नजरेसमोरच असायचे. आई मोलमजुरी करायची. परिस्थिती तशी बेताचीच. लहान भावाचे शिक्षणही सुरू. अशा कठीण परिस्थितीत तिने जिद्दीने ७७ टक्के गुण मिळविले.

बातम्या आणखी आहेत...