आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र शासनाने लोककलेच्या माध्यमातून घेतलेल्या जनजागृतीच्या उपक्रमास जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने दिली. राज्य सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्यातील १५ तालुक्यांत ही मोहीम राबविण्यात आली. आनंद-तरंग फाउंडेशन, (वाघेरे-इगतपुरी), नटराज लोककला अकादमी (इगतपुरी) व चाणक्य कला मंच या तीन संस्थांची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली होती. ३० कलावंतांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.
जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील ६३ गर्दीच्या ठिकाणांवर कोरोना नियमांचे पालन करून कार्यक्रम झाले. भारुड, कीर्तन, पोवाडा, लोकगीत, पथनाट्य, लोकनाट्याच्या स्वरूपात शासकीय योजनांची माहिती व यशोगाथांची ही लोककलेची वारी सर्वसामान्य लोकांना भावली. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रत्येक कार्यक्रमाचे रिपोर्टिंग जिओ टॅगिंगसह असलेल्या छायाचित्र व व्हिडिओद्वारे करण्यात आले. वाघेरे, इगतपुरी येथील आनंदतरंग फाउंडेशनचे शाहीर उत्तम गायकर यांनीदेखील जनजागृती मोहिमेच्या माध्यमातून कलाकारांना नवसंजीवनी मिळाली असल्याचे सांगितले.
कलापथकांचे काम सुरू
शासनाच्या योजनांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहोचविताना मनस्वी आनंद वाटला. शासनाच्या या उपक्रमातून कोरोनाकाळात कलापथकांचे थांबलेले काम सुरू होऊन रोजगार उपलब्ध झाला. - डॉ.राजेश साळुंखे, चाणक्य कलामंच, नाशिक
आमच्यासाठी तर शाबासकीच
जनकल्याणकारी योजनांचा जागर करत असताना लोकांचा भरभरून मिळालेला प्रतिसाद जणूकाही आमच्यासाठी शाबासकीची थापच होती. गाव, शहरातून सादरीकरण करताना लोकांनी आमचा केलेला सत्कार हा खऱ्या अर्थाने शासनाचा होता.- शाहीर बाळासाहेब भगत, इगतपूरी
१५ तालुक्यात, ६३ गावांमध्ये असे झाले कार्यक्रम
आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मोहिमेतून १५ तालुक्यांतील ६३ गावांमध्ये कार्यक्रम झाले. त्यात नाशिकमध्ये बी. डी. भालेकर मैदान, मखमलाबाद बस स्टॅण्ड, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती, परफेक्ट मार्केट, नांदूरनाका, रामसेतू पूल येथे शासकीय कामांची, योजनांची जनजागृती झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.