आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकवर पाणी कपातीचे ढग:42 दिवस पुरेल इतकेच पाणी, 7 ऑगस्टपर्यत पुरणार पाणी; 1 जूलैनंतर पाणी पुरवठ्याच्या फेरनियाेजनाच्या हालचाली

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जून महिना संपण्यास केवळ चार दिवस बाकी असून अद्यापही वरुणराजाने कृपा न दाखवल्यामुळे गंगापुरसह महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी आरक्षण झपाट्याने कमी हाेवू लागले आहे. पाणी पुरवठा विभागाने नुकत्याच घेतलेल्या आढाव्यात साधारणपणे 7 ऑगस्टपर्यंत अर्थातच पुढील 42 दिवस पुरेल इतकेच पाणी आरक्षण बाकी आहे.

पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी कपातीच्या दिशेने पाऊले टाकल्यानंतर आता नाशिक महापालिकाही पुढील आठवड्यात एकुणच आढावा घेवून एकतर देखभाल दुरुस्तीच्या निमित्ताने अघाेषित कपात करणे किंवा नाशिककरांना काटकसरीने पाणी वापरण्यासाठी जनजागृती करण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराला प्रामुख्याने गंगापूर धरण समूह व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यातील गंगापुर धरणाची साठवणुक क्षमता दिवसागणीक कमी हाेत असून अशा परिस्थीतीत मुकणे धरणातील पाणी वापर वाढवला जात आहे. या सर्व धरणातून नाशिक शहरासाठी दरवर्षी 15 आॅक्टोबर ते 31 जुलै दरम्यान धरणातील पाणीसाठा आरक्षित केला जात असतो. यावर्षी गंगापूर धरणातून 4000, मुकणेतून 1500 तर दारणा धरणातून 100 अशाप्रकारे एकूण 5600 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षित असून आतापर्यंत गंगापूर धरण समुहातून 3641 तर मुकणे धरणातून 1150 असे जवळपास 4792 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाचा वापर करण्यात आला आहे. गंगापूर धरण समूहात आता 358 तर मुकणेत 349 असे 807 दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण शिल्लक आहे. हे पाणी साधारण पुढील 42 दिवस पुरेल अशी स्थिती असून गेल्यावेळचा अनुभव बघता यंदाही 30 जूनपर्यंत समाधानकारक पाऊस सुरू न झाल्यास 1 जुलै रोजी पाणीपुरवठ्याचे फेरनियोजन करून पाणी कपातीबाबत निर्णय हाेवू शकताे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

गतवर्षापेक्षा धरणात पाणी कमी

सद्यस्थितीत शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांतून दररोज 19.20 दशलक्ष घनफूट पाणी उचलले जाते. शिल्लक पाणीआरक्षण 807 दशलक्ष घनफुट असून साधारण हे पाणी 7 ऑगस्टपर्यंत पुरू शकते. मात्र जस जसा धरण तळ गाठेल तसे पाणी उचलणे अवघड हाेईल. गेल्यावर्षीच्यातुलनेत धरणात पाणी साठा कमी असून सध्यस्थितीत गंगापुर धरणात 1569 द.ल.घ.फुट इतकेच पाणी आहे. गेल्यावर्षी मात्र याच कालावधीत 2125 द.ल.घ फु इतके पाणी हाेते. मुकणे धरणात गेल्यावर्षी 1620 दलघफु इतके पाणी असताना यंदा मात्र 2280 द.ल.घ फु इतके पाणी आहे मात्र मुकणेतून जास्ती पाणी ऊचलण्यास परवानगी नाही. दरम्यान, गेल्यावेळी 10 जूलैनंतर पाऊस हाेण्यास सुरूवात झाली मात्र धरण भरण्यास 25 जूलैपासून सुरूवात झाल्यामुळे पुढील महिना महत्वपुर्ण ठरणार आहे.