आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:सुपर ५० राज्य राबविणार; केंद्रीय याेजना एम्स, आयआयटीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांना सुविधा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आदिवासी विद्यार्थ्यांना देशपातळीवरील एम्स, आयआयटीसह इतर दर्जेदार संस्थांमधून अनुक्रमे डाॅक्टर आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न साकार करता येणार आहे. केंद्र पुरस्कृत ‘सुपर ५०’ या प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रमाचा उत्तम परिणाम आल्याने ही योजना आता राज्य सरकारकडून नियमित राबविली जाणार आहे.

प्रत्येक अपर आयुक्तालयनिहाय विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना राष्ट्रीय संस्थांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळावा यासाठी प्रशिक्षण देत त्यांची तयारी आदिवासी विकास विभागाकडून केली जाईल. विशेष म्हणजे प्रायोगिक तत्त्वावरील ५० विद्यार्थीसंख्या आता वाढणार आहे. राज्यस्तरावर त्याचा निर्णय होणार असला तरीही अपर आयुक्तालयनिहाय ६० अशी चार आयुक्तालयांतून मिळून २४० विद्यार्थ्यांना संधी मिळेल. अनुसूचित जमातीमधील अकरावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांना डाॅक्टर व इंजिनिअर होण्यासाठी केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ‘सुपर ५०’ हा उपक्रम राबविला.

निवडक विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला पेस आयआयटी ॲण्ड मेडिकल संस्थेतर्फे सीबीएसइ बोर्डांतर्गत विरार (जि. पालघर) येथील वागड पेस ग्लोबल स्कूल येथे अकरावी व बारावी इयत्तेत प्रवेश देण्यात आला होता. मेडिकल आणि इतर इंजिनिअरिंगसाठी नावाजलेल्या संस्थांमध्येही काही विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. हीच बाब लक्षात घेऊन आता ही योजना राज्य सरकारद्वारे नियमित राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनात २ वर्षे व्यर्थ, आता २४० विद्यार्थ्यांना संधी
गत तीन वर्षांत सुपर ५० प्रायोगिक तत्त्वावर राबविली गेला. आता केंद्रात आणि राज्यात एकच विचाराचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सुपर ५० साठी वाढीव निधी उपलब्ध करून देण्यास हिरवा कंदिल दाखविला असून, बजेटमध्ये त्याची स्वतंत्र तरतूद करण्यात येणार आहे.

तज्ज्ञांचेही मार्गदर्शन दिले जाणार
प्रायोगिक तत्त्वावरील उपक्रम यशस्वी झाला आहे. सुपर ५० मधील विद्यार्थ्यांची राष्ट्रीयस्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशही झाले आहेत. ही उत्तम योजना नियमित सुरू करावी, संस्थेतील शिक्षकांसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न आहे.
हिरालाल सोनवणे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

बातम्या आणखी आहेत...