आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

413 तरुणांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र:मुख्यमंत्री महोदय, नियुक्त्या द्या किंवा आत्महत्येची परवानगी द्या : तरुणांची आर्त हाक

नाशिकएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • बेफिकीर राज्य सरकारमुळे पुण्याच्या स्वप्निल लोणकरचा बळी गेल्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप

अधिवेशन काळात विधिमंडळाच्या सभागृहात गुंजणारे हे दोन शब्द- ‘मुख्यमंत्री महोदय...’ या वेळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच व्यक्त झाले. पण ही हाक मुख्यमंत्र्यांच्या सत्ताधारी पक्षातील सदस्यांची नाही की ‘जनहिता’च्या नावाने आरोळ्या ठोकणाऱ्या विरोधकांचीही नाही. ती आहे राज्यातल्या ४१३ तरुणांची, ज्यांच्या अधिकारी बनण्याच्या स्वप्नांचा सरकारच्या नाकर्तेपणामुळे चुराडा होतोय. ‘नियुक्त्या द्या, अन्यथा आत्महत्येची परवानगी द्या,’ असे जीवघेणे विनंतीपत्र या तरुणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात राज्य लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या नियुक्त्या आणि पुण्यातील स्वप्निल लोणकरचा बळी हा विषय ऐरणीवर येणार आहे. १९ जून २०२० ला राज्यातील ४१३ तरुण राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झाले. उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक या पदांसाठी यांची निवड करण्यात आली होती. ६/७ वर्षे अथक मेहनत करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून तीन टप्प्यांवरील ही निवड पूर्ण केली होती. मात्र, राज्य सरकारने यांना नियुक्त्या न दिल्याने बिकट आर्थिक परिस्थिती, समाजात होणारी मानहानी आणि अस्थिर भविष्यामुळे आलेल्या नैराश्याच्या गर्तेत हे तरुण सापडले आहेत.

८७% उमेदवारांवर अन्याय

 • या ४१३ उमेदवारांपैकी १३ % म्हणजे ४८ उमेदवार आर्थिक मागास वर्गातील आहेत
 • ३६५ उमेदवार इतर आरक्षण वर्गातील आहेत.
 • ७२ उमेदवार मराठा समाजाचे पण खुल्या प्रवर्गातून परीक्षा दिलेले आहेत.

आयोगही तोकडा, मुलाखती रखडल्या

 • राज्य लोकसेवा आयोगावरील ४ पदे गेल्या ३ वर्षांपासून रिक्त आहेत. फक्त अध्यक्ष आणि एक सदस्य एवढ्या दोन खांबी तंबूवर आयोगाची मदार सुरू असल्याने निवड प्रक्रियेसही विलंब होत आहे.
 • आयोगातील या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे मुलाखतीचे चार ऐवजी फक्त दोन पॅनल सुरू आहेत. त्यामुळे परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती रखडल्या आहेत.

केस स्टडी
सोलापुरातील तरुणीची व्यथा - नायब तहसीलदाराची परीक्षा उत्तीर्ण, कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपले, आता उदरनिर्वाहाची चिंता
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू या लहानशा खेड्यातील सोनाली भाजीभाकरेने तब्बल ६ वर्षे अभ्यास करून एक स्वप्न पाहिलं तहसीलदार बनण्याचं. गेल्या वर्षी १९ जूनला नायब तहसीलदार म्हणून सोनाली उत्तीर्ण झाली आणि तिचे स्वप्न हाकेच्या अंतरावर येऊन ठेपले. लवकरच शासकीय सेवेचे नियुक्तिपत्र मिळणार म्हणून सोनालीने हातातील खासगी नोकरी सोडली.

गावातील पहिली महिला अधिकारी म्हणून गावकऱ्यांनी तिचे कौतुक केले. पण कोरोनाने घाला घातला.एप्रिल-मे महिन्यांत तिचे आई-वडील आणि मोठा भाऊ अशा तिघांचे छत्र हरपले. उपचारांसाठी १५ लाखांचा चुराडा झाला आणि आज लहान भावासह सोनालीसमोर उदरनिर्वाहाचे संकट उभे आहे. सोनाली डोळ्यांत पाणी आणून ‘दिव्य मराठी’शी आपले दु:ख बोलून दाखवत होती. आमची व्यथा, आमचे प्रश्न सरकारला कळत नसतील तर आमच्यापुढेही आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे ती म्हणाली.

का रखडल्या नियुक्त्या?

 • १९ जून २०२० रोजी हा निकाल लागला होता. त्यानंतर २ महिन्यांत या नियुक्त्या होणे अपेक्षित होते.
 • मात्र, सरकारने त्या न केल्याने ९ सप्टेंबर २०२० च्या मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कचाट्यात सापडल्या.
 • ५ मे रोजी २०२१ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यावर बाकी नियुक्त्या देण्याचा उल्लेख केला.
 • मात्र, त्यानंतर २ महिने उलटले तरी सरकारने त्यावर निर्णय न घेतल्याने या विद्यार्थ्यांचे मनोबल खालावत चालले आहे.
 • सर्वोच्च न्यायालयाचा निकाल ९ सप्टेंबर २०२० रोजी आला. त्याआधी नियुक्त्या झाल्या असत्या तर मराठा उमेदवारांनाही संधी मिळाली असती.

नैराश्यातून आयुष्य संपवले.....
पुण्याच्या स्वप्निल लोणकर (२४) या एमपीएससी उत्तीर्ण तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वर्ष २०१९ मध्ये पूर्व व मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही मुलाखती झाल्या नाहीत, तर वर्ष २०२० मध्ये पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षाच झाली नाही. उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाली नसल्याने नैराश्येपोटी स्वप्निलने आयुष्य संपवले. या प्रकरणामुळे एमपीएससीचा गलथान कारभार आणि राज्य सरकारची बेफिकिरी ठसठशीतपणे समोर अाली आहे.

बातम्या आणखी आहेत...