आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:स्वर पालवी; सन्मान दश कलांचा, सप्तरंगी कलाविष्कार

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध कलांचा संगम उत्तम कलाकृतींसह सादर झालेला स्वर पालवी, सन्मान दशकलांचा या कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. एकाच मंचावर दहा कला आणि ४७ महिला कलाकारांचा संच, उत्तम कलाकृतींसह हा आगळावेगळा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. बाबाज थिएटर्स आणि सुवर्णा क्षीरसागर यांच्या स्वरांजली संगीत संकुल या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वर पालवी सन्मान दश कलांचा हा कार्यक्रम प. सा. नाट्यगृहात महाराष्ट दिनी पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विश्वास ठाकूर, कवी प्रकाश होळकर, डॉ. अविराज तायडे, केशव अण्णा पाटील, जे. पी. जाधव, शामराव केदार, नितीन सुगंधी, दिलीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात निःस्वार्थ सेवा देणाऱ्या डॉ. रंजना कुलकर्णी, हेमा नातू तसेच दसककर भगिनी यांचा विशेष गौरव करण्यात आला.

उकाड्याने असह्य झालेल्या मनावर स्वरांची पालवी फुलली. मीना निकम यांच्या भावमधुर स्वरांतून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सत्यम शिवम सुंदरम..या गीतावर सुमुखी अथनी यांच्या शिष्यांनी कथक नृत्याविष्कार सादर केला. रसिका नातू देसाई यांच्या तरुण आहे रात्र अजुनी...या गीताने रसिकांची दाद मिळवली. भार्गवी कुलकर्णीच्या आर्त स्वरातून पिया तोसे नैना लागे ने आणि त्याचबरोबर सोनाली करंदीकर यांच्या भरतनाट्यम करणाऱ्या शिष्यांनी रसिकांच्या मनावर भुरळ पडली. चिन्मयी जोशी वैद्य यांच्या व्हायोलिन वादनातून गोरी गोरी पान या बाल गीताने बच्चे कंपनीची दाद मिळवली.

सुवर्णा क्षीरसागर यांच्या एक प्यार का नगमा.. या गीतावरील व्हायोलिन वादनाने रसिकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. दीप्ती जोशी लिखित कॅटवॉक कथा आणि पल्लवी कुलकर्णी यांचे अभिवाचन रसिकांना भावुक करून गेले. या सर्व गीतांना तितकीच समर्थ साथ देणाऱ्या रागेश्री धुमाळ (सिंथेसायझर), पूजा शुक्ल- पाठक (गिटार), प्रिया वझे ( ऑक्टोपॅड), राधिका रत्नपारखी -गायधनी (तबला), वैष्णवी भडकमकर (तबला), गौरी सारंग (साईड रिदम) यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...