आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांना ‘तालाभिषेक’ची पर्वणी:शनिवारी रंगणार स्वर आणि तालाचा संगीत महाेत्सव

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिककरांना तालाभिषेकाच्या पर्वणीची संधी मिळणार असून या पर्वणीत त्यांना पंजाब घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक अल्लारखाँ साहेबांचे शिष्य पं. याेगेश सम्सी यांचे तबलावादन अनुभवता येणार आहे. त्याचबराेबर भारतरत्न पं. भीमसेन जाेशी यांचे नातू विराज जाेशी यांचीही यावेळी गायनसेवा हाेणार आहे.

गेल्या ५३ वर्षांपासून नाशिक महानगरातील संगीत क्षेत्रात तबल्याचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या ‘पवार तबला अकादमी’ आयोजित पं. भानुदास पवार स्मृती संगीत महोत्सवाचे हे २५ वे वर्ष आहे. यानिमित्ताने अल्पारंभ एज्युकेशनल अँड कल्चरल फाउंडेशन या दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘तालाभिषेक’ या संगीत महोत्सवाचे आयोजन केले गेले.

याच महोत्सवांतर्गत शनिवारी (दि. २४) सायंकाळी ६ वाजता कुर्तकोटी शंकराचार्य न्यास सभागृह, गंगापूररोड येथे हा संगीत महाेत्सव रंगणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे यांचे हस्ते होईल. विराज जोशी यांचे गायनाचे शिक्षण वडील श्रीनिवास जोशी आणि पं. सुधाकर चव्हाण यांच्याकडे सुरू असून पं. भीमसेन जोशी यांच्या गायकीचा वारसा ते पुढे नेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात त्यांनी गायन सादर केले आहे. प्रसिद्ध गायक पं. दिनकर कैकिणी यांचे सुपुत्र असलेले पं. योगेश सम्सी उ. अल्लारखाँ साहेबांचे गंडाबंध शिष्य असून देश-विदेशात स्वतंत्र तबलावादन आणि साथसंगत यासाठी त्यांचा नावलौकिक आहे. या कार्यक्रमात कुणाल काळे आणि अद्वय पवार तबला, संस्कार जानोरकर संवादिनी, गुरुप्रसाद गांधी तर अमित भालेराव तालवाद्यांवर साथसंगत करतील. या कार्यक्रमास प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. तरी नाशिककर रसिकांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन नितीन पवार आणि रघुवीर अधिकारी यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...