आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव:नाशिक व नगर जिल्ह्याच्या सीमेवरील टाहाकारी येथील श्री जगदंबा मातेचा यात्रोत्सवास सुरुवात

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र पौर्णिमेला सुरू होणाऱ्या नाशिक नगर जिल्ह्याच्या सीमेवरील श्री जगदंबा मातेच्या यात्रेला उद्यापासून सुरूवात होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील टाहाकारी गावात भरणारी ही यात्रा दरवर्षी भरते. दरम्यान, मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.

वियोगात फोडला टाहो..

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात नाशिक जिल्ह्याच्या सरहद्दीवरील टाहाकारी या गावी वसलेले श्री जगदंबा मातेचे शक्तिपीठ अतिशय भव्य व प्राचीन मंदीर आहे. पंचवटी वरून रावण सीतेला पळवून घेऊन जात असताना सीतेने श्रीरामाच्या वियोगात याच ठिकाणी टाहो फोडला म्हणून हे ठिकाण टाहोकरी व पुढे अपभ्रंश होऊन टाहाकारी असे या गावाचे पडले.

हेमाडपंथी शैलीचे मंदीर

संपूर्णपणे हेमाडपंथी शैलीत असणारे श्री जगदंबा मंदिर हे या शक्तिपीठाचे वैशिष्ट्य आहे. संशोधकांच्या संशोधनात या मंदिराला पूर्वी शिखर असल्याचे पुरावे ही आहेत. परंतु, सध्या मात्र मंदिराला उंच भव्य दिव्य घुमटाकृती पाच कळस शाबूत आहेत . अखंड मंदिर हे 72 भव्य खांबांवरती तोललेले असून मंदिराच्या आतून व बाहेरून सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे.

पुरातत्व विभागाच्या अख्यत्यारित

मंदिराभोवती अखंड शिळांची पवळी वजा भिंत ही आढळते . सध्या मंदिराचे विकास काम हे भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित येत असून पुरातत्व खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी थोडेफार विकास कामे झालेली असली तरीही इतक्या सुस्थितीत असलेले हे मंदिर अजूनही हवे तितके प्रसिद्धीस आलेले नाही.

चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा

जगदंबा मातेचे वर्षभरात दोन मुख्य उत्सव असतात चैत्र पौर्णिमेला जगदंबा मातेची मोठी यात्रा भरते व नवरात्रात घटस्थापनेपासून तर दसऱ्यापर्यंत या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची रीघ लागते याच दरम्यान मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते व गावकऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण गावाला व येणाऱ्या सर्व भाविकांना या ठिकाणी रोज अन्नदान केले जाते.