आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दाेन दिवसांपासून शहरातील अनेक सायबर कॅफेंमध्ये गर्दी वाढल्याचे निदर्शनास येताच आम्ही काॅलेजराेड, गंगापूरराेड भागातील काही सायबर कॅफेमध्ये चाैकशी केली. येथे असलेली गर्दी हाेती ती पाेलिस भरतीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी. मात्र इच्छुकांचे चेहरे त्रस्त दिसत हाेते. काही जण सकाळपासून या ठिकाणी बसलेले हाेते. संबंधीत वेबसाइट सुरूच हाेत नसल्याने हे तरुण मेटाकुटीला आले हाेते. राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, वेबसाइटची दुरुस्ती न झाल्याने पोलिस भरतीची ही वेबसाइट दिवसभर बंद येत आहे. तर, अनेकांचे अर्ज पूर्ण भरल्यानंतर शेवटी वेबसाइट अचानक बंद पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील उमेदवारांना रात्रभर कॉम्प्युटरसमोर बसावे लागत आहे. पूर्ण अर्ज भरल्यानंतर अनेकांना शुल्क भरण्यास ही अडथळे येत आहेत.
अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. भरतीप्रक्रियेत सुरुवातीपासून गोंधळ सुरू आहे. रिक्त पदांचा बदललेला गोषवारा आणि नाशिकच्या जागा बृहन्मुंबईत वाढविण्यात आल्या. त्यामुळे हैराण झालेल्या उमेदवारांना अर्ज नोंदणीच्या अंतिम टप्प्यात मन:स्तापाला सामोरे जावे लागत आहे. २०१९ पासून राज्य पोलिस दलात भरतीप्रक्रिया झालेली नाही. त्यामुळे तीन वर्षे सलग रिक्त झालेल्या पदांची भरती आता होत आहे. कोरोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्णसह उच्चशिक्षितांचे पोलिस भरतीकडे लक्ष आहे. त्यामध्ये नाशिक ग्रामीण दलात १६४ पोलिस शिपाई आणि १५ चालकांची भरती होत आहे, तर राज्यात १५ हजारांपर्यंत रिक्त जागा भरल्या जात आहेत. यामुळे लाखो उमेदवार नियमित अर्ज नोंदणीसाठी वेबसाइटवर जात आहेत.
परंतु, यामुळे भरतीप्रक्रिया राबविण्याऱ्या ‘महाआयटी’ संस्थेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र आहे.३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज नोंदणीची मुदत देण्यात आली होती.मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, वेबसाइट अजूनही व्यवस्थित चालत नसून अर्ज भरताना शेवटच्या टप्प्यात वेबसाइट बंद पडत असल्याने उमेदवारांची डोकेदुखी वाढत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत अर्ज नोंदणीतील घोळ दूर करण्याची मागणी उमेदवारांकडून केली जात आत आहे.
मध्यरात्रीही वेबसाइट चालेना; हेल्पलाइनही बंद पोलिस भरतीचा अर्ज भरताना अनेकवेळा वेबसाइटवर ‘द सर्व्हिस इज अनअव्हेलेबल’ असा मेसेज येत आहे. दिवसभर वेबसाइटवर लोड येत असल्याने मध्यरात्रीनंतर किंवा पहाटे वेबसाइट बरी चालेल या अपेक्षेने उमेदवार रात्री अर्ज करण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरीही वेबसाइट चालत नाही. तर प्रशासनाकडून दिलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधल्यावर संपर्क होत नसल्याचे चित्र आहे.
अर्ज भरताना मनस्ताप पोलिस भरतीचा अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहे.दिवसभर साइट चालत नाही. वेबसाइट केव्हा सुरू होईल याची ही खात्री नसल्याने रात्री जागी राहावे लागते. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. -राहुल मोरे, उमेदवार
वेबसाइट होते अचानक बंद; पुन्हा नव्याने अर्ज नोंदणी वेबसाइटवर अर्ज नोंदणीनंतर शुल्क भरताना ओटीपी येतो, पण पैसे वर्ग होत नसल्याची तक्रार उमेदवारांकडून केली जात आहे. अचानक वेबसाइट बंद पडत असल्याने पुन्हा नव्याने अर्ज नोंदणी करावी लागते त्यातच दिवस जाताे.सर्व्हर डाऊन झाल्याचा मेसेज येतो. बँकेकडूनही शुल्क जमा झाल्याचे मेसेज येत नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.