आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महासभा:करवाढ रद्द, भाजपला उपरती; निर्णय ‘नगरविकास’च्या हाती

नाशिक7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अखेरची महासभा तत्कालीन आयुक्त मुंढेंचा निर्णय ठरवला बेकायदेशीर

१ एप्रिल २०१८ नंतर अस्तित्वात येणाऱ्या अर्थातच घरपट्टी रेकॉर्डवर येणाऱ्या मिळकतींना अव्वाच्या सव्वा दराने लागू केलेला कर मागे घेण्यासाठी सत्ताधारी भाजपला तब्बल चार वर्षानंतर उपरती झाली. तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हा निर्णय महासभेने बेकायदेशीर ठरवत या प्रस्तावाची अंमलबजावणी करू नये, असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांचा भाजपविषयी वाढता रोष लक्षात येत दिले. महासभेने करवाढ रद्द करण्याचा ठराव संमत केला तरी चार वर्षांपूर्वी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी मिळाली असल्यामुळे करवाढ रद्द करायची झाल्यास राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे धाव घ्यावी लागणार आहे. त्यामुळे करवाढ रद्दचा प्रस्ताव कागदोपत्री राहणार आहे.

महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सहाव्या पंचवार्षिकमधील शेवटच्या महासभेत भाजपने चुका दुरुस्त करण्याचा सपाटाच लावला. २०१८ मध्ये ज्यावेळी नाशिककरांवर अवास्तव दरवाढ झाली त्यावेळी स्थायीच्या सभापती असलेल्या हिमगौरी आहेर-आडके यांनी चार वर्षांनंतर संबंधित करवाढ अन्यायकारक असून त्याचा फटका शहरातील घरगुती, वाणिज्य, औद्योगिक अशा विविध घटकांना बसत असल्याचा दावा करत करवाढ मागे घेण्याचा प्रस्ताव सादर केला. पालिका हद्दीतील औद्योगिक वसाहतीत कारखाने कायम रहावे म्हणून पूर्वी कमी दर ठेवले होते मात्र, मुंढेंनी मूल्यांकन दरात वाढ केल्याने थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. पालिकेने विकसित व अविकसित भागाचे सर्वेक्षण करून मूल्यांकन दर निश्चित करावे व १ एप्रिल २०१८ पासून लागू दरवाढ योग्य विचार करून रद्द करावी असा प्रस्ताव संमत केला.

मुख्यालयात छत्रपती शिवरायांचा पुतळा
पुणे महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिका मुख्यालयाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे पत्र नगरसेवक जगदीश पाटील यांनी दिल्यानंतर त्यास महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंजुरी दिली. शिवाय सहा विभागांत प्रत्येकी एक तक्रार निवारण केंद्र, सिडको विभागात नवीन अग्निशमन केंद्र तसेच भारतनगर झोपडपट्टीवासीयांना घरकुलांचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापौर सतीश कुलकर्णी यांची राजकीय निवृत्ती
महापालिकेच्या राजकीय इतिहासात भीष्माचार्य अशी ओळख असलेल्या किंबहुना सलग पाच वेळा नगरसेवक राहिलेल्या, माजी उपमहापौर ते महापौर असा प्रवास करणाऱ्या सतीश कुलकर्णी यांनी गुरुवारी महापालिकेच्या शेवटच्या महासभेत यापुढे महापालिका निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करत एकप्रकारे राजकीय निवृत्तीची घोषणा केली. यावेळी काहीसे भावनिक झालेल्या कुलकर्णी यांनी रस्ते विकास, शहर बससेवा यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या माध्यमातून शहर विकासाची शब्दपूर्ती करताना मेट्रो निओ, आयटी हब, बीओटीवर भूखंड विकास, लॉजिस्टिक पार्क आणि नमामि गोदा यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना चालना दिल्याचे सांगितले.

आयुक्तांची दांडी; महापौरांकडून नाराजी
भाजपच्या सत्ताकाळातील अखेरची महासभा असल्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांना सभागृहात कामकाज करण्याची अपेक्षा होती. मात्र कोराेना निर्बंध असल्याचे कारण देत ऑफलाइन महासभेला प्रशासनाने परवानगी नाकारली. त्यानंतर ऑनलाइन महासभा सुरू झाल्यानंतर आयुक्त कैलास जाधव हजर नसल्यामुळे महापौर नाराज झाले. आयुक्त जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत महासभा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. नगरसचिव राजू कुटे यांनी ऑनलाइन अधिकारी हजर असल्याचे सांगितले. मात्र, महापौरांच्या शेजारी किमान आयुक्तांनी अखेरच्या सभेसाठी उपस्थित रहावे असा हट्ट कायम असल्यामुळे तसेच त्यास सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांना पाठविण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...