आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’तर्फे कोरोना गुरुवंदना:‘दिव्य मराठी’च्या सर्व कार्यालयांत शिक्षकांचा सत्कार, खरी ज्ञानक्रांती शिक्षकच घडवतील : विवेक सावंत

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
वेबिनार गौरव सोहळ्यात सहभागी शिक्षक व मान्यवर.
  • कोरोना काळात विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणाऱ्या शिक्षकांचा केला गौरव

बौद्धिक स्वामित्व हक्कांमधून मिळणारी रॉयल्टी ही भारतापुढील भविष्यातील मोठी संधी असून, ही ज्ञाननिर्मिती शिक्षकांशिवाय अशक्य असल्याचे मत ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ आणि एमकेसीएल फाउंडेशनचे अध्यक्ष विवेक सावंत यांनी मांडले. कित्येक देशांच्या एकत्रित जीडीपीपेक्षाही अधिक बौद्धिक स्वामित्व हक्कांचे मालक असलेल्या अॅपलचे उदाहरण त्यांनी दिले. कोरोनाकाळात मुलांचे पोषण, आरोग्य व शिक्षणाचा एकात्मिक विचार केला तरच नवीन भारताची निर्मिती होईल, असे ते म्हणाले. “दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित “कोरोना गुरुवंदना’ या वेबिनार गौरव सोहळ्यात ते बोलत होते. या ऑनलाइन सोहळ्यात राज्यातील ५० हून जास्त पुरस्कारप्राप्त शिक्षक सहभागी होते.

कोरोनात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचवण्याचे आव्हान होते. या अडचणींवर मात करून शिक्षक करत असलेले ऑनलाइन-ऑफलाइन प्रयोग “दिव्य मराठी’ने गणेशोत्सवाच्या काळात “शिक्षणाचा श्रीगणेशा’ या वृत्तमालिकेतून प्रकाशात आणले. शिक्षक दिनानिमित्ताने आयोजित “कोरोना गुरुवंदना’ या वेबिनार कार्यक्रमाने त्याची सांगता झाली. यात सहभागी राज्यातील ४० शिक्षकांचा प्रमुख पाहुणे सावंत यांनी गौरव केला. सावंत म्हणाले, भारताचे उज्ज्वल भविष्य कुठल्याही कारखान्यातील उत्पादनातून नाही, सेवाक्षेत्रातील वितरणातून नाही तर बौद्धिक स्वामित्व हक्कांच्या मानधनातून येणार आहे. या ज्ञानक्रांतीतील शिक्षकांच्या भूमिकेबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.

कोरोनानंतरच्या ऑनलाइन जगात विषमतेची नवीन दरी तयार होत असताना, ती सांधण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकांच्या कामाची दखल घेण्याच्या उद्देशाने हा गौरव करण्यात येत असल्याची भूमिका “दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आ‌वटे यांनी प्रास्ताविकात मांडली. ऑनलाइन शिक्षणातील अडथळ्यांवर मात करून धडपडणाऱ्या चाळीस शिक्षकांच्या वतीने जळगावच्या प्रणाली सिसोदिया, औरंगाबादच्या अदिती शार्दूल, सोलापूरच्या सरस्वती पवार, अमरावतीच्या दीपाली बुबुळकर अकोल्याचे संदीप कुलट आणि नाशिकच्या शालिनी बच्छाव यांनी त्यांच्या यशस्वी प्रयोगांची आणि कल्पक उपक्रमांची माहिती दिली.

‘दिव्य मराठी’च्या सर्व कार्यालयांत शिक्षकांचा सत्कार
ऑनलाइन शिक्षणाचे सृजनशील मार्ग शोधणाऱ्या व ऑफलाइन शिक्षणाचे उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचा या वेळी “दिव्य मराठी’च्या वतीने गौरव करण्यात आला. औरंगाबाद, नाशिक, जळगाव, सोलापूर, अमरावती व अकोला कार्यालयांतील या गौरव सोहळ्यात तेथील शिक्षक प्रतिनिधी सहभागी होते. शाळा बंद असल्याने तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व तंत्रज्ञानाच्या मर्यादा ओलांडून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचे अनुभव शिक्षकांनी मांडले.

विशेष मुलांना जोडून ठेवण्याचे आव्हान
ऑनलाइन शिक्षण म्हणजे एका जागेवर तासन‌्तास बसणे, मात्र खुर्चीत पाच मिनिटेही स्थिर बसू न शकणाऱ्या विशेष मुलांचे शिक्षण लॉकडाऊनच्या काळात सुरू ठेवण्याचे मोठे आव्हान होते. यात पालकांच्या सहभागातूनच पुढे जाता आले. पालकांशी संवाद व समन्वय यामुळे विशेष मुलांना जोडून ठेवता आले. - अदिती शार्दूल, विहंग शाळा प्रमुख, औरंगाबाद