आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन हप्त्यांपूर्वी आमची एक शेळी बिबट्याने खाल्ली... रात्री पण एक शेळी अर्धवट खाऊन मारून टाकली... घरात लहान पोरं आहेत.. त्यामुळे भाऊ रात्रभर घरातील कोणीच झोपलं नाही... पराती वाजवून रात्र काढली...त्यात सकाळीच साडेआठला बिबट्या शेळ्यांसाठी टपून बसलेला.. आता घरातल्या लहान पोरांचं अन् उरलेल्या शेळ्यांचं काय? सीताबाई गांगुर्डे चिंतातुर चेहऱ्याने ‘दिव्य मराठी’ला सांगत होत्या.
सिन्नर फाटा येथील सामनगाव रस्त्यावरील अश्विनी काॅलनी येथे गत महिन्यापासून बिबट्याचे नागरिकांना दर्शन होत आहे. या भागात शेळ्या, कोंबड्या असून कुत्र्यांची संख्याही अधिक असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बिबट्याने बकऱ्यांच्या गोठ्याच्या दिशेने कूच केली, परंतु गांगुर्डे परिवारातील काही सदस्य बाहेर असल्याने त्याने धूम ठोकली. बाहेर कुणी नसते आणि बिबट्या थेट आत शिरला असता तर.. या विचारानेच गांगुर्डे परिवाराचा काळजाचा ठोका चुकतो.
वन विभागाने आता या ठिकाणी पिंजरा लावला आहे. सकाळी बिबट्या दिसल्याचा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होताच येथे बघ्यांची दिवसभर मोठी गर्दी जमली होती. मात्र, जोपर्यंत बिबट्या जेरबंद होत नाही तोपर्यंत परिसरातील सर्वजण जीव मुठीत धरुन बसले आहेत. दरम्यान, सातत्याने बिबट्याचे दर्शन होऊनही वन विभागाचे कर्मचारी फिल्डवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा कार्यालयामधील कामालाच अधिक प्राधान्य देत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
बिबट्याच्या वारंवार दर्शनाने दहशत
महिन्यापूर्वी चेहडी शिव येथे नारायण बोराडे यांना रात्री अकराच्या दरम्यान बिबट्या आडवा गेला. पुन्हा जेलरोड येथील वाघेश्वरी नगर परिसरात तो आढळला. आता पुन्हा तीन दिवसापासून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूस तो दिसत असल्याने नागरिकांत दहशत निर्माण झाल्याचे नगरसेवक बाजीराव भागवत यांनी सांगितले.
एक नाही तर चार पिंजऱ्यांची गरज
बिबट्याला फिरण्यासाठी मोकळी जागा आहे, त्यामुळे वन विभागाने केवळ एकच पिंजरा लावण्यापेक्षा तीन ते चार पिंजरे लावावेत. - गोकुळ नागरे, मनसे शहर सरचिटणीस
घरात लहान मुलं असल्याने वाटते भीती
घराच्या बाजूलाच गोठा असून त्यात पाच ते सहा बकऱ्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी एक गाभण बकरी बिबट्याने खाल्ली, तर शनिवारी रात्रीही दुसरी फस्त केली. वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा, घरात लहान मुलं असल्याने भीती वाटते. - अनिता गांगुर्डे, स्थानिक रहिवासी
स्थानिकांनी दक्षता घ्यावी
या परिसरात शेती आणि पडीक जागा असल्याने बिबट्याला लपण्यासाठी मोठी जागा आहे. पंधरा दिवसांपूर्वी मलाही बिबट्या दिसला होता. त्यावेळी स्थानिक नागरिकांना दक्षता घेण्याबाबत सांगितले होते. - संतोष अस्वले, स्थानिक रहिवासी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.