आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औद्योगिक प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार:तहसीलदार राहुल कोथळे यांची उद्योजकांना ग्वाही

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औद्योगिकरणाच्या दृष्टीने सिन्नरला अनन्यसाधारण महत्व आहे. येथील औद्योगिक वसाहतींतील मूलभूत समस्या सोडविण्याबाबत संबंधित सर्व यंत्रणांमार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील आणि त्यासाठी आपण जातीने पुढाकार घेणार, असे आश्वासन तहसिलदार राहुल कोताडे यांनी दिले.

सिन्नर परिसरातील मुसळगाव,माळेगावसह तालुक्यातील उद्योजकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स अससोसिएशन(आयमा) यांच्या पुढाकाराने सिन्नर निमाहाऊस येथे उद्योजक आणि संबंधित सर्व यंत्रणांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी मार्गदर्शन करतांना तहसिलदार कोताडे बोलत होते.

व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ,सरचिटणीस ललित बूब,बीओटी चेअरमन धनंजय बेळे,सुधीर बडगुजर,आशिष नहार,एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता जे.सी.बोरसे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, एमआयडीसीचे उप अभियंता उबाळे, के एल राठी,सचिन पवार(उपअभियंता एमएसडीसीएल) आदी सरपंच प्रिया केशव सांगळे आदी होते.

मुसळगाव आणि माळेगाव औद्योगिक वसाहतींमुळे सिन्नर तालुक्यात औद्योगिकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांमुळे स्थानिक उद्योजकांना ऑर्डर आणि कामगारांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याने तालुक्याचा गेल्या काही काळात झपाट्याने विकास झाल्याची आठवण तहसिलदार कोताडे यांनी करून दिली. औद्योगिकरणामुळे रोजगाराच्या संधी वाढल्या असल्या तरी मूलभूत समस्यांही मोठयप्रमाणात भेडसावत असल्याने त्या सोडविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी त्यांनी दिले.

सिन्नरमधील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास आयमा सातत्याने पुढाकार घेत असल्याचे बीओटी चेअरमन धनंजय बेळे यांनी सांगितले.सिन्नरचा औद्योगिक क्षेत्रात विकास होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील उद्योजकांच्या अनेक पायाभूत समस्या जैसे थे आहेत.आयमा संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या उद्योगांचे प्रतिनिधित्व करत असल्याने सिन्नरच्या उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले असून आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ.उद्योग कुठलाही असला तरी एका त्यापासून रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यास अनन्यसाधारण महत्व आहे. उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करणे हेच आमचे अंतिम उद्दिष्ट असल्याचे बेळे आपल्या भाषणात पुढे म्हणाले.

वसाहतीतील मुख्य रस्त्यांबरोबरच अंतर्गत रस्त्याची झालेली दुरवस्था, पथदीप ,ट्रकटर्मिनल ,कचरासंकलन व घंटागाडी आदी विषयांचा समावेश होता.कार्यकारी अभियंता जयंत बोरसे यांनी वसाहतीतील पथदीप येत्या आठ दिवसात सुरु करण्याचे आश्वासन दिले.

औद्योगिक वसाहतीतील शांतता व सुरक्षितता टिकवून ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांना चांगल्या प्रकारची आसनव्यवस्था करून द्यावी तसेच वसाहतीतील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास औद्योगिक संघटना व एमआयडीसीने पुढाकार घ्यावा अशी विनंती पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी यावेळी केली. आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ यांनीही उद्योजकांचे प्रश्न जाणून घेतले. बैठकीस वरुण तलवार,गोविंद झा,सचिन कंकरेज,राजेंद्र आहिरे, लक्ष्मण डोळे, किरण जैन, किरण वाघ,किरण भंडारी,अजय बाहेती,शिवाजी आव्हाड,चेतन अष्टुरे,संकेत वाबळे,आदी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...