आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा हंडा माेर्चा:अधिकाऱ्यांची मनमानी अन् सातपूरकरांना मिळेना पाणी; पालिकेवरच घागर उताणी

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह परिसरातील सर्वच धरणांत मुबलक पाणीसाठा आहे. असे असतानाही केवळ पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या असमन्वयामुळे शहरात विशेषत: सातपूर विभागात पाणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. याच्या निषेधार्थ सातपूरच्या शेकडाे महिलांनी महापालिका मुख्यालय, राजीव गांधी भवनावर हंडा माेर्चा काढला. आठ दिवसांत परिस्थितीत सुधारणा न झाल्यास आंदाेलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

नाशिक शहरासह महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या ग्रामीण भागातही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस अतिशय गंभीर हाेत चालला आहे. गेल्या वीस वर्षांत कधीही नाशिक शहराला पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवली नाही. ती आज प्रचंड जाणवत आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन केले जात नाही. पाणीपुरवठा अधिकारी नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. महापालिका हद्दीतील शिवाजीनगर, श्रमिकनगर, ध्रुवनगर, गंगापूर, अशोकनगर, धर्माजी काॅलनी, साेमेश्वर काॅलनी हा परिसर गंगापूर धरणाच्या उशाशी असून व येथे जलशुद्धीकरण केंद्र असूनही येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे. पाणीपुरवठा विभागात सावळा गोंधळ चालू असल्याचा आराेप माेर्चातील महिलांनी केला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी भाजपच्या वतीने माजी सभागृहनेते दिनकर पाटील व युवा माेर्चाचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात आला. माेर्चात भाजपा सरचिटणीस जगन पाटील, माजी नगरसेविका लता पाटील, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका माधुरी बोलकर आदींसह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

६ दिवस पाणी संकटानंतरही परिस्थिती जैसे थे
सिडकाेसह सातपूर व पश्चिम नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या १२०० व्यासाची जलवाहिनी फुटल्याने मागील १० ते १२ दिवसांपूर्वी नागरिकांना सहा दिवस पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागली हाेती. महापालिकेने बहुतांश ठिकाणी टंॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. तरीही एखाद्या दुर्गम भागाप्रमाणे शहरवासीयांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली हाेती. तशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी महिला स्वयंस्फूर्तीने माेर्चात सहभागी झाल्या हाेत्या.

बातम्या आणखी आहेत...