आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रजनन संस्थेशी निगडित इस्ट्रोजन हार्मोनचा स्राव आणि निर्व्यसनीपणा या २ कारणांमुळे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या सरासरी मृत्यूंची संख्या निम्मी असल्याचे दिसते. कोरोनातील मृत्यू असोत वा जन्ममृत्यू नोंदणी संचालनालयाच्या वतीने जाहीर होणारा अहवाल, पुरुषांच्या मृत्यूंच्या तुलनेत स्त्रियांच्या मृत्यूंचे प्रमाण तब्बल निम्म्याने कमी आहे. गरोदरपण व बाळंतपणातील जोखीम, पोषणाचा अभाव आणि अशक्तपणा व गर्भाशयाशी संबंधित आजारांचे वाढते प्रमाण स्त्रियांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र, एकूण आयुर्मानाचा विचार करता पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे आयुर्मान दुप्पट दिसते.
काय सांगतेय सरकारची आकडेवारी?
अहवालानुसार, २०२० मध्ये राज्यात ३ लाख ४५७६० लोकांचा मृत्यू झाला. त्यात २ लाख ३४,०६१ पुरुष, तर १ लाख ११,६९९ महिला होत्या. हेच प्रमाण आधीच्या वर्षीही कायम दिसते. २०१९ मध्ये राज्यात २ लाख ६५,१३२ लोक दगावले. त्यापैकी १ लाख ७१,८८३ पुरुषांचे मृत्यू होते, तर महिलांचे होते ९३,२४९.
महिलांत नियमित रक्तशुद्धी, रक्तात गुठळ्यांचे प्रमाणही कमी
स्त्रियांच्या वाढीव आयुर्मानाबाबत "दिव्य मराठी'ने तज्ज्ञांशी संवाद साधला असता रक्तशुद्धी आणि व्यसनांपासून दूर राहणे हीच २ कारणे पुढे आली.
1 मासिक पाळीच्या काळात सक्रिय इस्ट्रोजन हार्मोनमुळे स्त्रियांच्या शरीरातील रक्तशुद्धी नियमित होते, रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी असते. त्यामुळे कोरोनाकाळ, कोरोना पश्चात आणि एरवीही महिलांच्या मृत्यूंचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत कमी असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
2 पुरुषांत वाढत्या व्यसनाधीनतेमुळे उच्च रक्तदाब, मधुमेह व रक्तात गुठळ्यांचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सहव्याधींसह पुरुषांच्या मृत्यूंच्या शक्यता वाढल्याचे कोरोनाकाळ तसेच कोरोनापश्चात होणाऱ्या पुरुषांच्या मृत्यूंच्या विश्लेषणातून पुढे येत असल्याचे अभ्यासक म्हणतात.
निसर्गत: स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांच्या तुलनेत अधिकच
निसर्गत: स्त्रियांचे आयुर्मान पुरुषांच्या तुलनेत अधिकच असल्याचे दिसून आले आहे. आधुनिक जीवनशैलीतील पुरुषांमधील वाढती व्यसनाधीनता व अनुषंगाने तरुणपणातच होणारे अनेकविध आजार यामुळे पुरुषांचा मृत्युदर स्त्रियांच्या तुलनेत वाढताना दिसतो.
- डॉ. सुहास पिंगळे, राज्य अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.