आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लाइव्ह रिपोर्ट:नववर्षाची काळवंडलेली सकाळ अन् चिमुरड्या मीराचा आर्त टाहो...

अभिजित कुलकर्णी | नाशिक/मुंढेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी तळपत्या सूर्याला झाकोळून टाकणारे धुराचे काळे लोटच्या लोट आकाशात उठत होते आणि त्या काजळीखाली काळवडंलेल्या वातावरणात सर्वांची जिवाच्या आकांताने धावाधाव सुरू होती... स्फोटाचा प्रचंड आवाज आणि पाठोपाठ उठणारे आगीचे लोळ यामुळे सारेच सैरभैर झाले होते... तशातही ‘मेरे पापा कहाँ है, मुझे उनसे बात करनी है' एवढे एकच वाक्य सतत उच्चारून टाहो फोडणाऱ्या अवघ्या चार वर्षांच्या मीराचा (नाव बदलले आहे) रडवेला चेहरा आणि भेदरलेले डोळे काळजाला चटका लावून जात होते... अखेर जवळपास तासाभराने कंपनीत सुपरवायझर असलेल्या आणि स्फोटानंतर आतच अडकून पडलेल्या तिच्या पप्पांचा फोन लागला... त्यांचा आवाज ऐकताच मीराचा चेहरा उजळला अन् तशाही स्थितीत सर्वांनी काहीसा सुटकेचा नि:श्वास टाकला... कंपनीतील भीषण स्फोटानंतर उठत असलेले धुराचे काळेकुट्ट लोट तब्बल आठ किलोमीटरवरूनही स्पष्ट नजरेस पडत होते. त्यावरून घटनेच्या भीषणतेचा काहीसा अंदाज येऊ लागला होता. पण घटनास्थळाजवळ पोहोचलो अन् जणू काळजाचा ठोकाच चुकला. जवळपास प्रत्येक मिनिटाला एक अॅम्ब्युलन्स किंवा आगीचा बंब भरधाव वेगात घटनास्थळी दाखल होत होते. पण भडकलेल्या आगीच्या रौद्र स्वरूपामुळे रेस्क्यू टीमलादेखील काही अंतरावर थांबणे भाग पडत होते.

दुसरीकडे स्फोटानंतर कंपनीच्या आवारातून प्रत्येक जण बाहेरच्या दिशेने भांबावलेल्या स्थितीत वाट फुटेल तिकडे पळत होता. कंपनीच्या आवारातील कॉलनीत वास्तव्यास असलेल्या कामगार कुटुंबांतील बायाबापड्या आपल्या कच्च्याबच्च्यांना घेऊन महामार्गावर कुठेतरी आसरा शोधत होत्या. पुरुष मंडळी कुटुंबीयांना लवकरात लवकर जवळच्या एखाद्या सुरक्षित स्थळी कसे हलवता येईल त्यात गुंतली होती. स्फोटाच्या वेळी कंपनीच्या आवारातच असलेल्या कन्हैयाकुमार यादव याने सांगितले की, कंपनीत कामगारांसाठी पाच इमारतींत आमच्या राहण्याची सोय आहे. नाइट शिफ्ट उरकून आल्यावर मी सहकाऱ्यांसह आमच्या खोलीत झोपलो होतो. अचानक प्रचंड मोठा आवाज झाला व आमची इमारत हादरून गेली. काही कळायच्या आत जो तो बाहेर पळत सुटला. आम्हीसुद्धा जिवाच्या आकांताने गेटबाहेर पळालो. राजकुमार यादव या युवा कामगाराचा अनुभवही असाच होता. साडेअकराच्या सुमारास अचानक स्फोट झाला व खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर होऊन त्या इतरत्र उडाल्याने काही जणांच्या चेहऱ्याला, डोळ्यांना इजा झाली. काही मिनिटांतच सगळे जण असेंब्ली पॉईंट जवळ जमले आणि गटागटाने लगेचच तिथून आम्हाला प्रवेशव्दाराबाहेर जाण्यास सांगण्यात आले. पण, नेमके काय झाले आहे ते कुणालाच काही समजत नसल्याचे तो म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...